व्यापारी संघटनेची मागणी; एसटी प्रशासनाकडे निवेदन सादर…
कुडाळ
शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी त्याचा फटका येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या त्रुटी तात्काळ दूर करा,अशी मागणी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने एसटी प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत , सचिव भूषण मठकर , खजिनदार नितीश म्हाडेश्वर, प्रसाद शिरसाट,द्वारकानाथ घुर्ये,राजन नाईक, अवधूत शिरसाट, अश्विनी गावडे आदी उपस्थित होते.
या शहरात नव्याने बस स्थानक बांधण्यात आले आहे. शहरातील व्यापार हा मोठया प्रमाणावर ग्रामिण भागावर अवलंबून आहे. त्यासाठी ग्रामीण व शहरीभाग जोडणे एस.टी. विभागावर असते.त्यामुळे विचार करता शहराचे बसस्थानक हे प्रशस्त , सोईचे असल्यास त्याचा मोठा फायदा स्थानिक बाजारपेठेला होतो. परंतु कुडाळ शहरात नव्याने बांधण्यात आलेले बस स्थानक वाढत्या कुडाळ शहरातील व्यापाऱ्यांला अपूरे आहे . जर काही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होईल . बसस्थानका ठिकाणी असलेले सुलभ शौचालय हे पूर्ण दिवस उघडे ठेवून त्याची स्वच्छतेची काळजी एस.टी. महामंडळाने घ्यावी . त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी प्रवासी त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतील व आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिल . बसच्या प्रतिक्षेत प्रवासी तासंतास उभे असतात . त्यांना उन्हाळयामध्ये उष्णतेचा व पावसाळयात पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो . त्यावर उपाय म्हणून स्थानका समोर सुसज्ज अशी शेड घालण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.