You are currently viewing मालवणी भाषेचे संवर्धन आणि जतन होणे गरजेचे – श्रीधर पाटील

मालवणी भाषेचे संवर्धन आणि जतन होणे गरजेचे – श्रीधर पाटील

निरवडेत रंगल्या “मिरगवणी व मालवणी गजाली…

सावंतवाडी

कोकणची आणि विशेषता सिंधुदुर्गातील मालवणी भाषेसह येथील परंपरा आणि सुसंस्कृतपणा सर्वाना भावते. त्यामुळे मालवणी भाषेचे संवर्धन आणि जतन होणे आवश्यक आहे.त्यासाठी गावागावात प्रत्येक कार्यक्रमात आता मालवणी बोली भाषेतूनच कार्यक्रम होणे गरजेचे आहे.तरच खऱ्या अर्थाने मालवणी बोलीभाषेला वेगळा दर्जा मिळेल,असे मत सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी येथे व्यक्त केले.

निरवडे येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी व ग्रामपंचायत निरवडे आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने “मिरगवणी व मालवणी गजाली” या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी नायब तहसीलदार मनोज मुसळे,प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर, सरपंच हरी वारंग, कोमसापचे तालुका अध्यक्ष संतोष सावंत, उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर,संदीप पांढरे,माजी सरपंच सदा गावडे,नागेश गावडे, शिल्पा सावळ,सुरेखा बोंद्रे,सुविधा गावडे,संजय तानावडे,ग्रामसेवक मधुकर घाडी,कोमसापचे जिल्हा सचिव विठ्ठल कदम, जिल्हा खजिनदार भरत गावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे,माजी तालुकाध्यक्ष सुभाष गोवेकर, सहसचिव राजू तावडे,दीपक पटेकर,मेघना राऊळ,सुहासिनी सडेकर आदी उपस्थित होते .

श्री पाटील पुढे म्हणाले,सिंधुदुर्ग आणि कोकणची बोलीभाषा मालवणीचे संवर्धन आणि जतन होणे आवश्यक आहे.निश्‍चितपणे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा हे काम उत्तम पणे करत आहे. मालवणी भाषा आणि मीरगवणी ची योग्य सांगड घालून खऱ्या अर्थाने कोकण आणि विशेषता सिंधुदुर्गाची परंपरा संस्कृती जपली जात आहे.मीरगवणी झाल्यावर पेरणी केली जाते. आणि हे पेरलेला उगवतं त्याप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषदेने हे जे काही मालवणी भाषा संवर्धनाबाबत आणि मीरगवणी कार्यक्रम ठेवून एक नवी संकल्पना नवी दिशा आजच्या पीडी समोर उभे करण्याचे काम केले आहे, कौतुकास्पद आहे,असे ते म्हणाले.

प्रसिद्ध मालवणी कवी गीतकार दादा मडकईकर यांनी निरवडे येथे झालेल्या मिरग गवणी आणि मालवणी गजाली या कार्यक्रमात आपल्या मालवणी कविता गीत सादर करत वेगळीच रंगत आणली. आणि खऱ्या अर्थाने मीरगवणी साहित्य मेळा मालवणी गजाली ने रंगला.यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष सावंत यांनी मालवणी बोली भाषेत प्रास्ताविक करत.मृग नक्षत्र म्हणजे मिरग कोकणात मिरगाला विशेष महत्त्व आहे, आणि हेच मिरगाचे महत्त्व विशद करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या बोलीभाषेतील मालवणी भाषा हळूहळू लोप पावत चालली आहे.ती साहित्य निर्मितीतून पुन्हा एकदा जोमाने पुढे यावी, तरुण पिढीला मालवणी बोलीतून साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा मिळावी आणि मालवणीची गोडी निर्माण व्हावी, मालवणी भाषेचे संवर्धन व्हावे,या हेतूने कोमसाप सावंतवाडी शाखेने यावर्षी मिरगवणी व मालवणी गजालींचा कार्यक्रम गाव पातळीवर. आयोजित केला. ही संस्कृती आणि ही परंपरा आजच्या पिढीसमोर ठेवण्याचे काम आम्ही केले आहे.या मालवणी गजाली आणि मीरगवणी बाबत एक नवी पुस्तिका संकलित केली जाईल. आणि कोकणची मालवणी भाषा आणि मिरवणी आणि येथील परंपरा रूढी याबाबत प्रचार-प्रसार केला जाईल,यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेतले जातील, असे स्पष्ट केले.

तर न्हावेली शाळेच्या साईशा गिरीश फटनाईक, पूर्वा बापू निर्गुण, सीमा बापू निर्गुण, मानसी परेश दळवी आदींनी मालवणी गजाली, कविता सादर केल्या. वायंगणी वेंगुर्ला येथील नकलाकार नाना कांबळी यांचे पक्षी, प्राण्यांचे आवाज, नकला, ग्रामसेवक मुकुंद परब यांच्या गजाली, शिक्षिका तन्वी पाटकर यांची नाटुकली, भाऊ आजगावकर यांचा जावई, तेजस बांदिवडेकर यांच्या मालवणी नकला, गजालींनी कार्यक्रमात रंगत आली. श्रीम.देवयानी आजगावकर, सुभाष गोवेकर, सुहासिनी.सडेकर, कवी दीपक पटेकर, कवयित्री मंगल नाईक-जोशी, मेघना राऊळ, आदींनी पावसाच्या बहारदार मालवणी काव्यरचना सादर केल्या. प्रज्ञा मातोंडकर यांनी मालवणी फुगडी, ओव्या गाऊन कार्यक्रमात वेगळेपण आणले. सुखदेव राऊळ, रितेश राऊळ, निरवडे शाळेच्या श्रीम.सुधा देवण आदींनी आपल्या स्वरचित मालवणी काव्यरचना सादर केल्या. सादरीकरणाने तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. कोमसाप कार्यकारिणी सदस्य कवी दीपक पटेकर यांनी आभार प्रदर्शन केले. न्हावेली शाळेच्या शिक्षिका श्रीम. स्मिता नाईक व श्रीम.आजगावकर, निरवडे शाळेच्या श्रीम.सुधा देवण यांनी मुलांना चांगले सहकार्य केले. “मिरगवणी व मालवणी गजाली” या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे सर्व सदस्य तसेच शैलेश माळकर,भरत माणगावकर, सतीश तोरस्कर, विलास गावडे, भरत माणगावकर आदींनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा