*सावंतवाडीचे प्रभारी तहसिलदार श्रीधर सावंत प्रमुख अतिथी*
*मालवणी भाषेचा प्रसार व संवर्धनाचा कोमसाप सावंतवाडीचा प्रयत्न*
सावंतवाडी :
कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी व ग्रामपंचायत निरवडे, निरवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतच्या सभागृहात “मिरगवणी व मालवणी गजाली” असा आगळावेगळा कार्यक्रम काल सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला…मृग नक्षत्र म्हणजे मिरग…कोकणात मिरगाला विशेष महत्त्व आहे, आणि हेच मिरगाचे महत्त्व विशद करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या बोलीभाषेतील मालवणी भाषा हळूहळू लोप पावत चालली आहे ती साहित्य निर्मितीतून पुन्हा एकदा जोमाने पुढे यावी, तरुण पिढीला मालवणी बोलीतून साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा मिळावी आणि मालवणीची गोडी निर्माण व्हावी, मालवणी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने कोमसाप सावंतवाडी शाखेने यावर्षी मिरगवणी व मालवणी गजालींचा कार्यक्रम गाव पातळीवर आयोजित करण्याचे ठरले होते. यासाठी सावंतवाडी तालुक्यातील विकासात्मक दृष्ट्या समृद्ध ग्राम असलेले निरवडे गावाची निवड करण्यात आली, त्यासाठी निरवडे सरपंच हरी वारंग यांनी मोठ्या उत्साहाने सहमती दिली, त्याचेच फलित म्हणजे निरवडे ग्रामपंचायत येथे रंगलेला मिरगवणी आणि मालवणी गजालींचा कार्यक्रम.
निरवडे ग्रामपंचायत येथे रंगलेल्या “मिरगवणी व मालवणी गजाली” कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील साहेब व नायब तहसीलदार मुसळे साहेब हे आवर्जून उपस्थित होते. सावंतवाडीतील प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांची देखील विशेष उपस्थिती होती. सर्वप्रथम कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ऍड.संतोष सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रास्ताविक केले. कोमसाप सहसचिव राजू तावडे यांनी मालवणी भाषेची थोरवी विशद केली. सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील साहेब व नायब तहसीलदार मुसळे साहेब यांच्या हस्ते विद्येची देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, माजी सरपंच सदा गावडे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदींच्या हस्ते पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कोमसाप तर्फे ऍड संतोष सावंत यांनी सरपंच हरी वारंग यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या सुंदर मालवणी कवितेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. न्हावेली शाळेच्या चिमुकल्या साईशा गिरीश फटनाईक, पूर्वा बापू निर्गुण, सीमा बापू निर्गुण, मानसी परेश दळवी आदींनी मालवणी गजाली, कविता सादर केल्या. वायंगणी वेंगुर्ला येथील नकलाकार नाना कांबळी यांचे पक्षी, प्राण्यांचे आवाज, नकला, ग्रामसेवक मुकुंद परब यांच्या गजाली, शिक्षिका श्रीम.तन्वी पाटकर यांची नाटुकली, भाऊ आजगावकर यांचा जावई, तेजस बांदिवडेकर यांच्या मालवणी नकला, गजालींनी कार्यक्रमात रंगत आली.
कोमसापचे श्रीम.देवयानी आजगावकर, प्रा.सुभाष गोवेकर, सौ.सडेकर, कवी दीपक पटेकर, कवयित्री सौ.मंगल नाईक-जोशी, सौ.मेघना राऊळ, आदींनी पावसाच्या बहारदार मालवणी काव्यरचना सादर केल्या. सौ.प्रज्ञा मातोंडकर यांनी मालवणी फुगडी, ओव्या गाऊन कार्यक्रमात वेगळेपण आणले. ऍड.संतोष सावंत यांनी ऍड.नकुल पार्सेकर यांची कविता सादर केली. पत्रकार सुखदेव राऊळ, रितेश राऊळ, निरवडे शाळेच्या श्रीम.सुधा देवण आदींनी आपल्या स्वरचित मालवणी काव्यरचना सादर केल्या. तहसीलदार श्रीधर पाटील साहेबांनी देखील आपली मालवणी भाषेची आवड दाखवत काही शब्द मालवाणीतून बोलून कार्यक्रमाचा आनंद लुटला व कोमसाप आणि निरवडे ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या मालवणी कविता सादरीकरणाने तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली.
न्हावेली शाळेच्या शिक्षिका श्रीम.नाईक व श्रीम.आजगावकर, निरवडे शाळेच्या श्रीम.सुधा देवण यांनी मुलांना चांगले सहकार्य केले. “मिरगवणी व मालवणी गजाली” या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष संतोष सावंत, राजू तावडे, निरवडे सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, सदा गावडे, दादा गावडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद, ग्रामसेवक घाडी,आणि निरवडे ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी निरवडे सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, कोमसाप सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष ऍड.संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, माजी तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, सहसचिव राजू तावडे, कार्यकारिणी सदस्य दीपक पटेकर,श्रीम.मेघना राऊळ, .श्रीम.प्रज्ञा मातोंडकर, श्रीम.मंगल नाईक-जोशी, कोमसाप जिल्हा कार्यकारिणी सचिव विठ्ठल कदम, कोषाध्यक्ष भरत गावडे, श्री.दत्ताराम सडेकर, श्रीम.सडेकर, श्रीम.देवयानी आजगावकर, श्री.भाऊ आजगावकर, श्रीम.सुधा देवण, मालवणी कवी दादा मडकईकर, सौ.मडकईकर, श्रीम.तन्वी पाटकर, श्रीम.नाईक मॅडम, दादा गावडे, ग्रामसेवक घाडी, श्री.पांढरे, ग्रामपंचायत सदस्य, आणि मोठ्या संख्येने निरवडे ग्रामस्थ उपस्थित होते.