You are currently viewing पहिल्या पावसात …

पहिल्या पावसात …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

पहिल्या पावसात .. बाई या पहिल्या पावसात
सारे बसतात गात … बाई या पहिल्या पावसात ..

राघू मैनेची ती जोडी बघा चोचीतच चोच
किती भिजल्या चिमण्या, फडफड पहा नाच…
बाई या पहिल्या पावसात…

आले बीज टरारून वर घनाची ती धून
वीजबाई कडाडते,घाली धिंगाणा नाचून …
बाई या पहिल्या पावसात…

वारा घालतो पसारा, उडवितो तो भर्रारा
पावसाचे जाती लोट,वर वाजतो नगारा
बाई या पहिल्या पावसात …

नदी नाले ते तुडूंब खरपूस सुटे वास
आता पिकतील पोटे हाच धरतीचा ध्यास
बाई या पहिल्या पावसात …

आता चिमण चाऱ्याला येई शेतात उधाण
हिरवाई बहरली, आता थांबली तिफण
बाई या पहिल्या पावसात …

घराघरातून आस आता पाऊस दे घास
नको नको देवा आता, लावू गळ्यास तू फास
बाई या पहिल्या पावसात …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ७ जून २०२२
वेळ : रात्री ११ : २४

प्रतिक्रिया व्यक्त करा