You are currently viewing सोशल मीडिया आणि साहित्य चोरी

सोशल मीडिया आणि साहित्य चोरी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख

आधुनिकतेचा जसजसा प्रसार होत गेला, तसतसे बरेच बदल आपल्याला जाणवू लागले. माणसे बदलली, वातावरण, हवामान, निसर्ग सुद्धा बदलला…आधुनिकतेची कास धरून माणूस सुधारला असे प्रत्येकाला वाटू लागले. जो तो आपल्यात झालेला बदल आनंदाने मिरवू लागला…कपडेलत्ते बदलले, राहणीमान बदलले…बोलण्या चालण्याच्या पद्धती बदलल्या…परंतु बदलली नाही ती माणसाची मानसिकता…
माणूस कितीही सुधारला…पुढारला तरी आजही श्रेयवादाच्या भोवऱ्यात गिरक्या घेत आहे, गुरफटून स्वतःलाच मारून टाकत आहे. मी कोण आणि माझ्यात काय आहे हे जगाला दाखविण्यापेक्षा दुसर्याने केलेले कृत्य, कर्म स्वतः करत आपल्यातल्या स्वतःलाच संपवत आहे.
आपण झेरॉक्सच्या दुकानातून घेतलेली झेरॉक्सची प्रत किती दिवस टिकते? नक्कीच कार्बनच्या सहाय्याने काढलेली प्रत काहीच दिवसात पुसट होत जाते आणि हळूहळू नामशेष होते. अगदी तसंच आहे माणसाने दुसऱ्यासारखा होण्याचा प्रयत्न करणे…दुसऱ्याच्या राहणीमान, सवयीची चोरी करणे. परंतु अलीकडे अशी चोरी करता करता लोक दुसऱ्यांच्या लेखनाची, साहित्याची चोरी करू लागलेत…
पण खरंच हे किती दिवस शक्य आहे?
सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेला आणि दैवी देणगी असणारी व्यक्ती आपल्या प्रतिभाशैलीतून मनातले विचार, निसर्गातील लहरीपणा, सृष्टी सौंदर्य, समाजातील घटना, संकल्पना कागदावर रेखाटत असते आणि बरेचसे साहित्य चोर असे साहित्य चोरून आपल्या नावावर खपवतात…अगदी प्रसिद्धीस देऊन पुरस्कारही मिळवतात… परंतु हे वाङ्मयचौर्य किती दिवस चालणार? कायमची खुशी देणार का? याचा साधा विचारही करत नाहीत.
लेखक, कवी, साहित्यिक आपण महत्प्रयासाने लिहिलेले साहित्य प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सोशल मीडियावर पाठवतात…अलीकडे सर्वात स्वस्त आणि जलद प्रसिद्धीचे मध्यम म्हणजे सोशल मीडिया…हजारो लोकांपर्यंत सहज पोचण्याचा एकमेव मार्ग हाच. त्यामुळे आपले साहित्य लोकांपर्यंत पोहचावे, लोकांनी वाचावे, त्याची प्रशंसा करावी, चुका असतील तर त्याही दाखवून द्याव्यात अशा एक ना अनेक आशांनी लेखक साहित्य सोशल मीडियावर पाठवतो…परंतु समाजात असेही काही साहित्यिक(?) आहेत, ज्यांच्या ज्ञानाच्या पोतडीत ज्ञान हे नसतंच, केवळ एखाद्याचं साहित्य उचलून थोडाफार फेरफार करून अथवा जसेच्या तसे त्या मूळ लेखकाचे नाव काढून आपल्या नावावर खपवून प्रसिद्धी, वाहवा मिळविण्याची सवय असते ते साहित्य चोरी करतात. एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास ‘वाङ्‌मयचौर्य’ म्हणतात. वाङ्‌मयचौर्य लेखक मूळ साहित्यकृतीचा निर्माता नसतानाही त्या साहित्यकृतीचा निर्माता असल्याचा दावा करतो. मूळ साहित्यकृती लपविणे, किंवा रूपांतरात तिचा मुळीच उल्लेख न करणे, याला वाङ्‌मयचौर्य असे संबोधतात.” सोशल मीडियामुळे वाङ्मयचौर्य करणे साहित्य चोरी करणे सहज शक्य झालं आहे, परंतु सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त करणे मात्र कठीण असते.
वाङ्मयचौर्य सारख्या प्रकारात मुख्यतः लेखनाची काही मूल्य गुंतलेली असतात. प्रत्येक लेखक, कवीची लिहिण्याची एक वेगळी शैली, धाटणी, पद्धत असते. वाक्यरचना करताना तो विशिष्ठ शब्द, लय पकडून लिहीत असतो. जशी त्या व्यक्तीची बोलण्याची शैली, भाषा असते तसाच तो लिहीत असतो. मराठी भाषा जरी प्रमाण असली तरीही प्रत्येकाच्या मनातील विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे लेखनात विविधता असते. मुळात ज्ञानात्मक, नैतिक आणि सौंदर्यात्मक लेखन अशी लिखाणाची मूल्य आहेत.
ज्ञानात्मक दृष्टीने विचार केला असता, प्रत्येकाचे ज्ञान हे वेगवेगळे असते, त्यामुळे ज्ञानात्मक वाङ्मयचौर्य हे ज्ञानाचा अभाव सहज दाखवते. ज्ञान नसताना ज्ञानाचा आभास निर्माण करणे सहज सोपे नसते. कारण एखादा जरी विषय चुकीचा अथवा अर्धवट ज्ञानाच्या आधारे लिहिला गेला तरी ज्ञानात असलेला अभाव दिसून येतो आणि लेखक उघडा पडतो, तिथेच त्याच्या लिखाणात दुसऱ्याच्या लेखनाची चोरी केल्याची शक्यता दिसून येते. वाङ्मयचौर्य व लबाडी यात अस्सलता नसतेच.
वाङ्मयचौर्य बाबत विचार केला असता, साहित्य चोरीच्या प्रकारात नैतिकता दिसून येत नाही तर विचारांच्या अस्सलतेबाबत बरेच प्रश्न उपस्थित होतात. जो अस्सल पणा मूळ लेखकाच्या धाटणीत असतो तो चोरी करणाऱ्याच्या लेखणीत येत नाही. त्यामुळे विचारांचा होणारा गुंता आणि चोरी केलेलं साहित्य आपल्या नावावर खपवताना उडणारा गोंधळ सहज ओळखून येतो.
सौंदर्यात्मता हा देखील प्रत्येक लेखकाच्या लेखनातील मुख्य घटक असतो. आपले लेखन सौंदर्यात्मक दृष्ट्या किती प्रभावी अलंकारिक होईल यासाठी लेखक खूप प्रयत्नशील असतो, त्यामुळे वेगवेगळे अलंकार, उपमा वापरून तो लिहीत असतो. मूळ लेखकाच्या उपमा, संकल्पना याची चोरी होत नाही, शब्द जरी चोरले तरी त्याच्या अंतरंगातील शब्दांचे अनमोल गाठोडे चोरीला जात नाही. त्यामुळे वाङ्मयचौर्य करणाऱ्याला अंशकालीन आनंद घेता येईल परंतु तो आनंद चिरकाल टिकत नाही. त्यामुळे वाङ्मय चोरी म्हणजे आपण ज्ञानी होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य…
आठवडा बाजारात फिरता व्यापार करणारे अळवावरच्या थेंबासारखे काहीच काळ टिकणारे व्यापारी आणि वडिलोपार्जित परंपरागत वर्षानुवर्षे पाय घट्ट रोवून व्यापार करणारे व्यापारी यात जेवढा फरक आहे तेवढाच कसलेला, ज्ञानार्जनाने युक्त असलेला साहित्यिक आणि वाङ्मय चोर यांच्यात आहे. खरा लेखक आयुष्यभर शब्दांची जपणूक, पूजा करतो, तेव्हाच ते शब्द मोत्यांच्या रुपात साहित्यात रुजून येतात.
पावसाळ्यात जशी अळंबी मातीत, ढिगाऱ्यावर, अगदी झाडांच्या बुंध्यावर जागोजागी रुजून येतात तसेच कोरोनाच्या काळात जिथे तीथे साहित्यिक जन्माला आले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वर्क फ्रॉम होम म्हणा अथवा घरात बसून राहणे यातून सोशल मीडियावर वाचन होऊ लागले, त्यातून अनेकांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली. दुसरा सोशल मीडियावर लिहितो, त्याला शेकडो, हजारो लाईक्स मिळतात, कमेंटचा पाऊस पडतो, मग मी लिहिले असता मला सुद्धा अशा लाईक्स कमेंट मिळाल्या तर? अशी भुते माणसांच्या मनात थैमान घालू लागली. परंतु लिहायचे कसे? आपल्याला तर असं लालित्यपूर्ण, लयबद्ध, अर्थप्राप्त लिहिता येते कुठे? असा प्रश्न निर्माण झाला…. तिथेच खऱ्या अर्थाने वाङ्मय चोरीने जन्म घेतला. तसं पाहता वाङ्मय चोरी हा पूर्वम्पार *चालत* आलेला विषय. परंतु गेल्या काही वर्षात तो *धावत* आहे. सोशल मीडियावर केलेली चोरी सोशल मीडियावरच पकडली जात आहे. चोरी करूनही वाङ्मय चोर *मी नव्हे त्यातला* अशाच अविर्भावात वावरतात…मूळ लेखकाने विचारणा केली असता…*चोरावर मोर शिरजोर* असेच वागतात. त्यामुळे लेखनाची अंगीभूत देणगी असणारे सिद्धहस्त लेखक मात्र हतबल झालेत….आणि वाङ्मय चोर मोठे लेखक असल्याच्या अविर्भावात मिरवत आहेत….सोशल मीडियावर लाईक्स, कमेंटचा आनंद लुटत आहेत. त्यांचा आनंद किती काळ टिकणार हे काळच ठरवेल परंतु…वाङ्मय चोर म्हणून त्यांच्या नावावर बसणारा शिक्का मात्र कायमचा उमटलेला ठळकपणे दिसत राहील हे मात्र नक्की…!
आपले साहित्य कुठेही प्रकाशित करताना, सोशल मीडियावर पोष्ट करताना वाङ्मय स्वतःचे हस्तलिखित, स्वलिखित असल्याबाबत मान्यताप्राप्त विशिष्ठ सांकेतिक चिन्हांचा वापर केल्यास वाङ्मयचौर्याला आळा घालता येतो….तरीही त्यातून वाङ्मय चोरी झाल्यास कायदेशीर बाबींचा आधार घेऊन गुन्हाही दाखल करता येतो. शेवटी प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच….पर्याय नसतो तो केवळ माणसांच्या मूळ मानसिकतेला….ती बदलणे केवळ त्यांच्याच हातात….!

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा