You are currently viewing वाद्याचा गजर…नव वधू – वरांची वेशभूषा अन् नगरपरिषद प्रशासन विरोधात निदर्शने

वाद्याचा गजर…नव वधू – वरांची वेशभूषा अन् नगरपरिषद प्रशासन विरोधात निदर्शने

इचलकरंजीत युवा महाराष्ट्र सेनेच्या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा

इचलकरंजी :

येथे आज सोमवारी वाद्याचा गजर ,नव वधू – वरांच्या प्रतिकात्मक वेशभूषेत जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र युवा सेनेच्या वतीने इचलकरंजी नगरपरिषदेच्या हुकूमशाही प्रशासकीय कामकाजाविरोधात नगरपरिषद इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली. तसेच नगरपरिषद मालकीची सर्व मंगल कार्यालये, नाट्यगृह, राजाराम स्टेडियम, जलतरण तलाव यासारख्या इमारती भाडेतत्त्वावर देवू नयेत ,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र युवा सेना संघटनेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी सर्व आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.दरम्यान ,या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा शहर परिसरात ऐकायला मिळाली.

इचलकरंजी नगरपरिषदेच्या मालकीची असणारी शहरातील मंगलधामसह इतर मंगल कार्यालये, नाट्यगृह , जलतरण तलाव, राजाराम स्टेडियम ही सर्व नागरिकांना सोयीची साधने आहेत. ही सर्व कार्यालये सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील, धर्मातील, जातीतील विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी माफक खर्चामध्ये उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने बांधली गेली आहेत.तसेच घोरपडे नाट्यगृह करमणुकीच्या दृष्टिकोनातून सादरीकरण व्हावे व कलाकारांना कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने बांधण्यात आले. जलतरण तलाव व राजाराम स्टेडियम यामधून चांगल्या पद्धतीचे स्पर्धेसाठी खेळाडू तयार व्हावेत हा महत्वपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आले आहेत.

परंतू, सद्यस्थितीत नगरपरिषद प्रशासनाकडून आर्थिक उत्पन्नाच्या नावाखाली सर्व मंगल कार्यालये, जलतरण तलाव, नाट्यगृह, राजाराम स्टेडियम भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता आर्थिक झळ सोसूनच मंगल कार्यालय व इतर इमारतींचा वापर करता येणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेची सर्व मंगल कार्यालये, राजाराम स्टेडियम, जलतरण तलाव व नाट्यगृह हे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मागे घेऊन सामान्य इचलकरंजीकरांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र युवा सेना संघटनेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला.

तत्पूर्वी , नगरपरिषद इमारतीच्या प्रवेशद्वारा समोर वाद्याचा गजर, नव वधू – वराच्या प्रतिकात्मक वेशभूषेत जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र युवा सेनेच्या वतीने इचलकरंजी नगरपरिषदेच्या हुकूमशाही प्रशासकीय कामकाजाविरोधात नगरपरिषद इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली. तसेच सर्व आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे राज्याध्यक्ष सॅम आठवले, राज्य संघटक राहुल लोकरे, शहराध्यक्ष अवधूत भोई, राज्य उपाध्यक्ष कृष्णा जावीर, अभिनेते बसवराज टक्कळगी, अभिनेत्री प्रिया पाटील, सचिन पाटील, सचिन बेल्हेकर, आनंदा नाईक, रोहित कल्याणकर, अभिजीत रजपूत, राजू दंडी, रोहित भोसले, तौसिफ इनामदार, समीर तिवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा