पुणे :
जेईई अॅडव्हान्स-२०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात अव्वल ठरला आहे. आयआयटी मुंबई विभागातील हा विद्यार्थी आहे. एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थांनी ही परीक्षा दिली होती. पेपर -१ आणि २ साठी एकूण ४३ हजार २०४ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स-२०२० साठी पात्र ठरले होते.
चिराग फलोर हा या परीक्षेत कॉमन
रँक लिस्टमध्ये टॉपर ठरला असून, त्याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत, तर आयआयटी रुरकी झोनच्या कनिष्क मित्तल कॉमन रँक लिस्टमधील १७ व्या क्रमांकासह विद्यार्थिनींमध्ये टॉपर आहे. तिने ३९६ पैकी ३१५ गुण मिळवले आहेत. मागील वर्षीदेखील जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा टॉपर महाराष्ट्रातीलच होता. कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळवले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी चिरागसह यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.चिरागला मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूटमध्ये मिळाला प्रवेश
चिरागला जगातील सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी एक असलेल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) अमेरिका येथे अॅडमिशन मिळाले आहे. चिराग हा यावर्षी एमआयटीमध्ये जागा मिळवणा-या भारतातील ५ विद्यार्थ्यांपैकी एक आहे.चिरागने या आधीही राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. त्याला राष्ट्रीय बाल पुरस्कारदेखील देण्यात आला आहे. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान स्पर्धा जिंकल्या आहेत. खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्रशास्त्र विषयक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये त्यांने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. चिरागला ऍस्ट्रोफिजिक्समध्ये संशोधन करायचे आहे.