आयजीएम नोकर भरतीत जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी ठिय्या आंदोलन
इचलकरंजी शहरातील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी कामगार भरतीमध्ये कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी आज शुक्रवारी
मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत आयजीएम रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांना घेराव घालत जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासह भरतीमध्ये पारदर्शकता असावी, अशी मागणी केली. मात्र, डॉ. माळी यांनी हा विषय संबंधीत मक्तेदार कंपनीचा असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आंदोलकांसह संतप्त कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना बाजूला करताना पोलीस व आंदोलकांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. प्रकार घडला. त्यामुळे आयजीएम रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.
इचलकरंजी शहरातील आरजीएम रुग्णालयामध्ये डी. एम. इंटरप्रायजेस कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू आहे. यात कक्षसेवक, कक्षसेविका पदासाठी यापूर्वी कोविड १९ काळात काम केलेल्या कर्मचार्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, सदर ठेकेदार कंपनीकडून पूर्वी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा
भरती करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. याबाबत मनसे प्रणित मराठी कामगार सेनेकडून संबंधीत वरिष्ठ कार्यालयास निवेदन देवूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटी कामगार व मराठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी आयजीएम
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.
दरम्यान, यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी हे रुग्णालयात आयसीयू युनिटचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करायला आले होते. याची माहिती मिळताच डॉ. माळी यांच्याकडे आपली व्यथा मांडत महिला कर्मचार्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी डॉ. माळी यांनी हा विषय माझ्या अधिकारात नाही. त्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा मंडल यांच्याशी संपर्क साधा ,असा सल्ला दिला.त्यामुळे संतप्त कर्मचारी व आंदोलकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.यावेळी आंदोलकांना बाजूला करताना पोलीस व आंदोलकांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली.त्यामुळे
आयजीएम रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.दरम्यान , प्रशासनाच्या उदासिन भुमिकेमुळे संबंधित कंत्राटी कर्मचार्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याचे दिसून आले.
या आंदोलनात मनसेचे नेते पुंडलिक जाधव, रवि गोंदकर, प्रताप पाटील, शहाजी भोसले, महेश शेंडे ,
योगेश दाभोळकर, मनोहर जोशी, रामा बागलकोटे ,अमित पाल, दीपाली भंडारे, पोपट हत्तीकर, सागर धुमाळ यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.