दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व सर्व्हिस रोड सुरु न केल्यास हायवे बंद करण्याचा दिला ईशारा
कोकण सिंचन विकास महामंडळ उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी वादातीत असल्याने बंद असलेल्या नांदगाव पुल सर्व्हिस रोडची पाहणी केली. यावेळी हायवे अधिकारी श्री.कुमावत आणि जागामालक नलावडे कुटुंबीय यांच्यासोबत याविषयी आढावा घेतला. यावेळी श्री.पारकर यांनी वादग्रस्त साडेतीन गुंठे जागेची तातडीने मोजणी करण्याची मागणी श्री.कुमावत यांच्याकडे केली. जर या मोजणीत साडेतीन गुंठ्यात सर्व्हिस रोड येत असेल तर आपली काही तक्रार नसल्याचे नलावडे कुटुंबीयांनी सांगितले. परंतु मोजणीत जर साडेतीन गुंठे जागा सर्व्हिस रोड मधे येत नसेल तर त्या जागेचा व त्या जागेतील बांधकामाचा मोबदला नलावडे कुटुंबीयांना देवुन लवकरात लवकर निवडा करावा अशी मागणी श्री.पारकर यांनी केली.
नांदगाव हायवे पुल चुकीच्या पद्धतीने बांधल्याने नांदगाव वासियांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हायवे लाईन आऊट चुकीची आहे, सर्व्हिस रोड संपादन करुन निवाडे केलेले नाहीत, नवीन निवाडे प्रलंबित आहेत, सर्व्हिस रोड बंद असल्याने अपघात होऊन मनुष्यहानी होत आहे, हायवे प्रधिनिकरण आणि महसूल विभाग आणि TLR यांच्यात एकसूत्रता नसल्याने अनेक समस्या प्रलंबित आहेत, वादग्रस्त साडेतीन गुंठे जमिनीचा प्रश्न लवकर मार्गी लागत नाहीये, ज्यांच्या जमिनी हायवे संपादित झाल्यात त्यांना योग्य मोबदला मिळत नाहीये, जोपर्यंत भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत जबरदस्तीने नांदगाव सर्व्हिस रोडचे काम करु नये या विषयी आक्रमक भूमिका श्री.पारकर यांनी श्री.कुमावत यांच्याकडे मांडली. यावेळी नलावडे परिवार यांच्या समस्या व मागण्याविषयी देखील चर्चा करण्यात आली.
यावेळी संदेश पारकर यांनी आक्रमक भूमिका घेत हायवे अधिकारी, महसूल विभाग, TLR यांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करुन या संदर्भात मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, पालकमंत्री श्री.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
या मागण्या व समस्यांच्या संदर्भात श्री.पारकर यांनी कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांच्याशी फोनवरून संपर्क करुन सर्व मागण्या व समस्या लवकरात लवकर पुर्ण करून सर्व्हिस रोड सुरु करण्याची मागणी केली. दोन महिन्यात हे सर्व प्रश्न मार्गी लावुन नांदगाव सर्व्हिस रोड सुरु करण्यात येईल असे आश्वासन प्रांताधिकारी यांनी संदेश पारकर यांना दिले. दोन महिन्यात नांदगाव, वागदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व्हिस रोड तसेच हायवे विषयी सर्व मागण्या व समस्यांची पूर्तता न झालेस शिवसेना व स्थानिक भूमिपुत्रांना घेवुन तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सिंधुदुर्ग मधील NH-66 हायवे बंद करण्यात येणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
यावेळी अँड.हर्षद गावडे, राजा म्हसकर, अतुल सदडेकर, ईमाम नावलेकर, प्रकाश मेस्त्री यांच्यासह नलावडे कुटुंबीय उपस्थित होते.