जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच …. लालित्य नक्षत्र वेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललितलेख
ओढ तुझी…क्षणाक्षणाला
वेड लावते माझ्या मनाला
उडुनी ये तू…..फुलपाखरा
विसरुनी भान जा तू…..
…..स्पर्शून तनाला
धुंद वेड्या मनाला…ओढ लावते फुलपाखरू…स्पर्शून जाता पंखावरचा…रंग सांडते फुलपाखरू… धरू जाता चिमटीत उडते…पंख पसरूनी घिरट्या घालते…अवखळ…नाजूक…रंगित फुलपाखरू…
या फुलांवरुन त्या फुलांवर बसते…मध शोषते…हसते…खिदळते…अन धावत सुटते उडणाऱ्या फुलपाखराच्या मागे…मनाचे हे असेच असते…बेधुंद…बेहोश होऊन स्वप्नांच्या दुनियेतील परीसारखे पंख लावून सैर करते अवकाशाची… नभांतील तारकांशी बोलते…चांदोबाशी हट्ट करून बसते…मन फुलपाखरू होते…प्रियकराच्या भेटीसाठी आतुर मन….कधी फुलांत रमते…कधी सुगंध बनून हवेत उडते…गंधाळते… कधी बहरते…मोहरते… पहिल्या पावसात गंधाळावं मातीने… अन्…गीत गावे मिलनाचे…पावसाचे धरणीशी झालेले मिलन…ढगांचा कडकडाट…जणू वाजंत्र्यांनी ढोल ताशावर काठीने बडवावे अन् त्या ताशांतून सुरांनी सूर धरावे…वाऱ्याने तुफान आणावे…झाडे, पाने, वेलींनी बेहोश होऊन वरातीत नाचावे… अन्…सनईतून मधुर सूर उमटावेत…वसुंधरेने अधीर होत गावे…
*वेडी तुझ्यासाठी मी…अजुनी यौवनात आहे…*
*तुझेच मी गीत गात आहे….*
*तुझ्या मिलना पसरले बाहु…*
*स्वप्नात कधी मी तुझ्या बाहुपाशात आहे..*
मिलनासाठी वेडावलेली धरणी…चिंब पावसाच्या वर्षावात आहे… गार गार धारांच्या वर्षावाने धरणी सुखावली…नदी…नाले…खडकातील निर्झर….अलवार पाझरले…सड्यावरच्या कातळावर आनंदाने फुलवुनी पिसारा मयूर नाचले…मोरपंख फुलताच मयुराने हर्षोल्लीत होत पिस सांडले…
मयुराच्या नृत्यात बेभान…पावसात मोती बरसले…
टीपटीप टीपटीप बरसता पाणी…अंग अंग भिजली धरणी…यौवन खुलले…झिरपले पाणी…वसुंधरा गाई पाऊस गाणी…
पावसाच्या मिलनाने शहारलेली…लाजलेली…मोहरलेली वसुंधरा…बीजांकुर फुटून नटली…सजली…हिरवाईची शाल ओढुनी… खळी पाडुनी गाली हसली…बावरली…
नव्या नवरीसारखी वसुंधरा नटली…मुरडली…हिरवे डोंगर..हिरवे शिवार…पानाफुलांत हिरवा संचार…मोत्यांच्या माळा लेवुनी…सजली झाडे, वेली धरोहर… चिमणा-चिमणी भिजली अंग…घरट्यात दोघे प्रणयांत दंग… गाय-वासरू कापे थरथर…गोठ्याकडे चाले सरसर…लगबग सुरू शोधी आसरा…सुकल्या पानांचा सडा पसारा…वरुणाचा सुटता संयम…ऐकू येते मंजुळ गाणे…गीत मनोहर….!
दीपि
दीपक पटेकर