सावंतवाडी संस्थानचे युवराज व अलीकडेच भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत प्रवेश केलेले युवराज लखमराजे भोसले यांचा आज वाढदिवस. सावंतवाडीच्या राजघराण्यातील कै.श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्यानंतर राजकारणात प्रवेश करणारे युवराज लखमराजे ही तिसरी पिढी. शिवराम राजांचे पुत्र बाळराजे यांनी कधीही राज्याच्या राजकारणात स्वारस्य दाखवले नाही. राजमाता श्रीमंत सत्वशिला देवी भोसले यांनी श्रीमंत शिवराम राजे यांच्यानंतर विधानसभेची निवडणूक लढविली होती, परंतु त्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजघराण्यातील कोणीही व्यक्ती राजकारणात दिसून आली नाही. श्रीमंत शिवराम राजे यांचे नातू युवराज लखमराजे यांनी अलीकडेच भाजपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला, त्यामुळे शहर भाजपला त्याचा नक्कीच फायदा होणार…युवराज लखमराजे यांचे सक्रिय राजकारणात आज पर्यंत कोणतेही कार्य नसले तरीही परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आपल्या मायभूमीत जनतेच्या सेवेसाठी त्यांनी राजकीय प्रवास करण्याची तयारी दाखवलेली आहे. भाजप कडून येत्या विधानसभेसाठी देखील त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच युवराज लखमराजे यांनी सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी तळागाळापर्यंत पोचण्याची अत्यंत आवश्यकता असून भविष्यात जर विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर गावागावात आपले नाव, आपण आणि आपले कार्य पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठीच युवराजांनी भविष्याकडे गांभिर्याने पाहत आपला राजकीय प्रवास सुरु केलेला आहे.
परदेशात उच्च शिक्षण घेऊन आलेले युवराज लखमराजे यांनी राजवाड्यातच सुसज्ज हॉटेल उभारून त्यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठीची तयारीदेखील सुरू आहे. भविष्यातील राजकीय प्रवासात येणाऱ्या अडचणींचा सामना करतानाच पक्षीय विरोधकांना देखील त्यांना तोंड द्यावे लागेल, अशी एकंदरीत परिस्थिती सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या चेहऱ्याकडे पाहता लक्षात येते. राजघराण्यातील युवराज यांना जनतेच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी वाढदिवस हा देखील चालून आलेला एक सुंदर योगच आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यासाठी येणारे लोक त्याचप्रमाणे मतदार संघातील जनतेकडून मिळणाऱ्या शुभेच्छा देखील भविष्य राजकारणात झेप घेण्यासाठी उर्जा देणारे असतील.
युवराज लखमराजे यांच्या नव्या राजकीय इनिंगमध्ये चौकर षटकारांनी सुरुवात होऊ दे… यश कीर्ती लाभू दे…अशा वाढदिवसानिमित्त संवाद मीडियाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा…