वैभववाडी :
कुर्ली गावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख मधुकर विठोबा कोकरे व उपशाखाप्रमुख मधुकर रघुनाथ सुतार यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे वैभववाडीत आम. नितेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेला धक्का दिला आहे. आम. नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती व कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी २ दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशानंतर सेनेचे तालुकाध्यक्ष मंगेश लोके यांनी भाजपात होणारे प्रवेश हे जबरदस्तीने होत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपानंतरही सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः भाजपा कार्यालयात उपस्थित राहून पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेशासाठी आमच्यावर कोणीही जबरदस्ती केली नसून गावचा विकास हा भाजपा व आम. नितेश राणे यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपात जाहीर प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आज वैभववाडी पक्ष कार्यालयात आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कुर्ली गावातील सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. या प्रवेशामुळे कुर्ली गाव शतप्रतिशत भाजपा झाले आहे. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मधुकर कोकरे, मधुकर सुतार, श्री. शेळके, बबन पांडुरंग कोकरे, प्रभाकर संतोष हुंबे, अरुण गणपत महाडिक, राजाराम तुकाराम साटम, चंद्रकांत तेली, श्री. सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
प्रवेश कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे माजी सभापती जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे तसेच सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी सभापती, सरपंच, बुथ अध्यक्ष, गाव अध्यक्ष व मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.