You are currently viewing ३१ मे रोजी जिल्हा परिषदेचे ३१ कर्मचारी निवृत्त

३१ मे रोजी जिल्हा परिषदेचे ३१ कर्मचारी निवृत्त

प्रशासनाने सन्मानाने केला सर्वांना निरोप समारंभ;अनेकांना दिले पेन्शन मंजुरीचे आदेश

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ३१ मे रोजी तब्बल ३१ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्व कर्मचाऱ्यांचा एकत्रित सत्कार प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याहस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून करण्यात आला. विशेष म्हणजे यातील १९ कर्मचाऱ्यांना यावेळी पेन्शन मंजूर झाल्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद फुललेला दिसत होता.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा निरोप समारंभ प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन भिसे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर एकत्रित निरोप समारंभ प्रथमच आज पार पडला. एकाच दिवशी तब्बल ३१ कर्मचारी निवृत्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या एकूण आस्थानेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे.

आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांत तीन वाहन चालक, एक हवालदार, दोन परिचर, एक सफाईगार व एक वरिष्ठ सहाय्यक, दोन उच्च श्रेणी मुख्याध्यापक, ९ उपशिक्षक, एक केंद्र प्रमुख, एक पदवीधर शिक्षक, चार रस्ता कामगार, एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविका, एक आरोग्य सहाय्यक व एक आरोग्य सहाय्यीका, दोन ग्राम विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रशासक प्रजित नायर व अन्य उपस्थितांच्या हस्ते आकर्षक प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच १९ जणांना पेन्शन मंजूर झाल्याचे आदेश देण्यात आले. प्रमाणपत्रावर जिल्हा परिषद फोटो, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोटो लावण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा