भारतात कोरोनाने कदाचित याआधी त्याच्या तीव्रतेसंबंधी सर्वोच्च अवस्था गाठली असून आता त्याच्या प्रादुर्भावाची घसरण सुरु झाल्याची शक्यता अर्थमंत्रालयाने वर्तवलीय. अर्थमंत्रालयाने सप्टेंबर महिन्याच्या आढावा अहवालात ही माहिती दिलीय. त्याचबरोबर अनलॉक आणि सरकारी पॅकेज यामुळे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा दावा केलाय.
आपल्या सप्टेंबर महिन्याच्या आर्थिक आढावा अहवालात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी म्हंटले आहे की भारताने कदाचित कोविड १९ आजारासंबंधी सर्वोच्च शिखर अवस्था गाठली असेल. १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दरम्यानची माहिती हे सूचित करते की सात दिवसांच्या काळात कोविड १९ च्या केसेस् या प्रति दिन ९३,००००वरून सातत्याने कमी होवून त्या ८३,००० इतक्या आल्या तर सरासरी चाचण्यांची संख्या ही १,१५,००० वरून १,२४,००० इतकी वाढली असे रविवारी प्रकाशित झालेल्या या अहवालात म्हटले आहे. यात असेही स्पष्ट केले आहे शासनाचे आर्थिक पॅकेज आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असलेले अनलॉक यांमुळे सप्टेंबर महिन्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील अर्थव्यवस्था सुधारत आहे.
हा अहवाल कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे स्पष्ट करताना असेही सांगतो की देशपाळीवर कोरोनाच्या संख्येत होत असलेली घट ही स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेला पुर्वपदावर आणण्यासाठी महत्वाची ठरते. ‘सोशल डिस्टंसिंग’ पेक्षा सावधगिरी बाळगून स्वत:चे संरक्षण करणे ही ‘जान भी और जहां भी’ संकल्पनेत चांगली उचित बसते असेही या अहवालात म्हटले आहे.