-संदेश पारकर यांचा ईशारा
टोलमाफीसाठी उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पूर्ण ताकदीनिशी आंदोलन छेडणार
एम.एच.07 नंबरप्लेट असलेल्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल माफी मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्या ओसरगाव टोल नाक्यावर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी सांगितले आहे.
सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी व्हायलाच हवी तसेच जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाकडूनही टोल घेऊ नये अशी भूमिका संदेश पारकर यांनी यापुर्वीच जाहीर केली आहे. तसेच टोलमाफी संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार, लोक्रप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, हायवे अधिकारी, महसूल अधिकारी तसेच हायवे संबंधित सर्व अधिकारी यांची एकत्रित एक बैठक व्हावी अशी मागणी संदेश पारकर यांनी केली आहे.
मुंबई गोवा महामार्गाची अजून बरीच कामे बाकी आहेत. तसेच काही जमीन मालकांना अद्याप मोबदला देखील मिळालेला नाही. मात्र केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल सुरु करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे रोज ये-जा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलचा फटका बसणार असल्याने एम.एच.07 नंबरप्लेट असलेल्या गाड्यांना टोलमाफी होणे गरजेचे आहे.
कणकवली देवगड वैभववाडी या तालुक्यातून जिल्हा मुख्यालय वा अन्य कामासाठी ओरोस, कुडाळकडे जाताना हा टोल सातत्याने भरावा लागणार आहे. महामार्गासाठी संपादित केलेल्या काही जागांचे निवाडे अजून पूर्ण व्हावयाचे आहेत. अनेक जमीनमालकांना मोबदला मिळालेला नाही. महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण केल्याशिवाय टोलवसुली सुरू करू नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. खारेपाटण ते झाराप हे 70 ते 80 कि.मी. चे काम झालेले असताना टोल वसुली कशासाठी असा सवाल देखील श्री.पारकर यांनी केला आहे.
जोपर्यंत हायवेचे काम 100% पुर्ण होत नाही तोपर्यत टोल वसुली सुरु करू नये अशी मागण्या यापुर्वीच संदेश पारकर यांनी केली आहे. या मागण्यांची पूर्तता न करता उद्यापासून टोलवसुली सुरु केल्यास सिंधुदुर्ग जिल्हावासिय आणि जिल्हाभरातील शिवसैनिकांना सोबत घेवुन ओसरगाव टोल नाक्यावर उद्या धडक देवुन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले आहे. उद्यापासून टोल सुरु केल्यास शिवसेना स्टाईलने टोलवसुली बंद पाडून प्रसंगी टोलनाका उध्वस्त केला जाईल असा ईशारा देखील श्री.पारकर यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हावसियांनी तसेच शिवसेना पदाधिकारी, लोकप्रिनिधीनीही व शिवसैनिकांनी उद्या 1 जुन रोजी सकाळी 10 वाजता ओसरगाव टोलनाक्यावर या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच एकाही सिंधुदुर्ग वासियांना टोल भरु नये असे आवाहन संदेश पारकर यांनी केले आहे.