You are currently viewing माणूस म्हणून जगतांना …

माणूस म्हणून जगतांना …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

किती मोठ्ठा विषय आहे हो हा …माणूस म्हणून जगतांना ..
प्रथम मला असा प्रश्न पडतो आहे की, हा असा विचार किती
माणसे करत असतील ? माणूस म्हणून जगतांना माणसाने
कसे जगले पाहिजे हा हिशोब जर माणसे करतील तर ..
जगात एक ही प्रश्न शिल्लक राहणार नाही.पण .. हो , हा पण ? मोठा अडसर आहे..

शाळेत रोज प्रार्थने साठी रांगेत उभे करतांना त्या रांगा नीट
व्हाव्यात म्हणून किती तरी प्रयत्न करावे लागतात. पण
रांगा मोडा म्हणताच.. क्षणार्धात रांगा विस्कळीत होतात.
तसेच चांगल्या गोष्टी अंगिकारायला फार वेळ लागतो व
घडी विस्कटायला एक क्षण ही पुरतो. तशीच माणसाची प्रवृत्ती संघटना पेक्षा विघटना कडे लवकर वळते. सुव्यवस्था
निर्माण करायला उशिर लागतो, त्या प्रमाणे सद् गुण अंगिकारणेही फार अवघड असते .

म्हणूनच समाजात साने गुरूजी आंबेडकर फुले
विवेकानंद तुकाराम रामदास मदर तेरेसा एकेकच निर्माण होतात व दुशा:सन दुर्योधन शेकडोंनी असतात. शकुनी तर
पावलोपावली भेटतात. हे शकुनी अतिशय आनंदात जगतात.
कारण दिवसभर कारस्थाने रचण्यात व लोकांना अडचणीत
आणण्यात ते एवढे व्यस्त असतात की दु:ख करायला त्यांना
वेळच नसतो. तो माणूस अडचणीत आला की त्यांचा सिनेमा सुरू होतो व ते त्याचा आनंद घेण्यात एकदम व्यग्र असतात.
त्या मुळे त्यांचा उगवणारा प्रत्येक दिवस सुखाचा असतो. हे
विघ्नसंतोषी सतत आगीत तेल ओततात व टाळ्या पिटत
लांबून गंमत बघतात . ही जमात एवढी कोडगी असते की
आपले काही चुकले आहे हे त्यांच्या गावी ही नसते.आणि
आपली प्रत्येकाची ह्यांच्याशी गाठ पडतेच पडते. आपला जळफळाट होऊन काही ही उपयोग नसतो कारण हे चाटू
लोक वरिष्ठांचे पाय चाटून त्यांच्या गुडविल मध्ये असतात
व त्यांना ही पथभ्रष्ट करत असतात.

म्हणून माणूस म्हणून जगतांना , किमान माणुसपणाची पथ्ये
पाळणे किती अवघड आहे. प्रेम दया करूणा सहानपभूती
हे सद् गुण माणसाला देवपणाला पोहोचवतात. पण किती
लोकांना याचे आकर्षण असते? अहो, यातला एक सद् गुण
ही माणसाचे कल्याण करण्यास पुरेसा असतो पण किती
लोक ते अंगिकारतात ? तसे असते तर आज घराघरातील
भांडणे, भावाभावातील वादविवाद, संपत्ती वरून खुनाखुनी
चारित्र्यावरून मारामाऱ्या झाल्या असत्या का? माणूस इतका
स्वार्थी आहे की एका आईच्या पोटी जन्म घेऊन ही रक्ताचा
भाऊ ही त्याला भाऊ न वाटता वैरी वाटतो.

राज्या राज्यात व राष्ट्रा राष्ट्रातही साम्राज्यवाद घर्मवाद
पराकोटीला गेलेले बघतो आहोत आपण ! कुठली माणुसकी
नि कुठले काय ? माणुसकी कशाशी खातात हे ही कित्येक
लोकांना माहित नाही इतके पराकोटीचे ते स्वार्थ असतात ते?
मी मी नि मी मी .. एवढीच त्यांची भाषा असते, दुसरी भाषाच
त्यांना कळत नाही, अशा लोकांपुढे डोके आपटून काही उपयोग नसतो.नशिब आपले की जगात थोडीफार चांगली
व सुज्ञ माणसे आहेत. मला वाटते, म्हणूनच हे जग चाललेले
आहे. घरी दारी ॲाफिस मध्ये ही विघ्नसंतोषी माणसे जीव
नकोसा करतात पण शांत डोक्याने त्यांना दुर्लक्षित करणे
हाच बऱ्या पैकी उपाय असतो कारण खूपसे वरिष्ठ ही
हलक्या कानाचेच असतात .छळणे हा त्यांचा एकमेव धंदा
असतो.

आज तरी चांगुलपणावरचा विश्वास उडून जावा असेच
माणसाचे वर्तन आहे, पराकोटीचे स्वार्थी असे.आशेचा किरण दिसू नये असे कधी कधी वाटते, पण जग चालतेच आहे, व
चालावेच लागते.पण लक्षात ठेवा , तुमचे १०० अपराध भरतात व सुदर्शन गळ्यावरून फिरतेच. त्या मुळे मी वाईट वागलो तरी
माझे भलेच होईल या भ्रमात कोणी राहू नये. म्हणतात ना..देवाच्या काठीचा आवाज होत नाही पण ती अचूक आपले
काम करते. तुम्हाला कुठेतरी उत्तर द्यावेच लागते. मग मला प्रश्न पडतो की , पौराणिक काळापासून इतके दाखले, उदाहरणे समोर असूनही माणूस शहाणा का होत नाही?
जी सुज्ञ माणसे आहेत त्यांना ही अग्नीपरीक्षा द्यावी लागते.
सामाजिक रोष पत्करावा लागतो. ते तावून सुलाखून निघतात.

खरेच का हो ? माणूस म्हणून जगणे इतके सोपे नाही?का माणसे माणसा सारखे, माणुसकी धर्म सांभाळून वागत नाही?
माझ्या मते वेडे वाकडे वागण्यापेक्षा सरळ वागणे किती सोपे
असते ना? शिवाय त्यामुळे प्रश्न निर्माण न होता सुटतात.
आणि हे सगळे माणसांना कळत नाही असे समजायचे का ?
आपल्याला कळते पण वळत नाही असा त्याचा अर्थ होतो.
मग या वर उपाय काय करायचा ?माझ्या जवळ तरी या प्रश्नाचे उत्तर नाही. कळत नसते तर गोष्ट वेगळी हो . ..!
इथे तर सारे कळते. पण वळत नाही .. मग काय करायचे?
माणूस जगतांना प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. काहींना अन्न
पाण्यापासून प्रश्न आहेत तर काहींना जिवंत राहण्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागतो. प्राक्तन म्हणून स्वीकारा
किंवा नशिब म्हणून सोडून द्या…!

शेवटी मी तर असे म्हणेन , “ माणसाने माणसाशी माणूस
म्हणून वागणे म्हणजे माणूस धर्म व हा पाळणे हे प्रत्येकाचेच
कर्तव्य नाही काय …?

शेवटी काय ? “ बहुरत्ना वसुंधरा “

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ३० मे २०२२
वेळ : ४ : २१

आणि हो … ही फक्त माझी मते आहेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा