You are currently viewing वन कर्मचाऱ्यांची पदे वाढवुन द्या; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी

वन कर्मचाऱ्यांची पदे वाढवुन द्या; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी

दोडामार्ग

हत्तींनी केलेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ आणि वाढवून मिळावी, वन कर्मचाऱ्यांची पदे वाढवून मिळावीत आणि त्यांच्या बदल्या रद्द कराव्यात, अशा मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाबा खतीब , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी अप्पर मुख्य वन सचिव लिमये यांना तिल्लारी खोऱ्यातील शेतकऱ्यांतर्फे दिले. तालुक्यातील हेवाळे, बांबर्डे, घाटीवडे, केंद्रे, सोनावल, पाळये, तेरवण मेढे, घोटगेवाडी, केर, मोर्ले या हत्तीबाधित क्षेत्रातील ग्रामस्थ, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २००२ पासून वरील गावांमध्ये हत्तींचा वावर असून, दिवसेंदिवस तो वाढत आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी वर्गासह ग्रामस्थ कामासाठी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. आजपर्यंत शेतपिके, फळबागायतीच्या नुकसानीपोटी तुटपुंजी रक्कम देण्याखेरीज शासनाने काही केले नाही. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे यंत्रणा कुचकामी ठरली आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी वन खात्याचा कर्मचारी वर्गही अपुरा पडत आहे. कर्मचाऱ्यांवर अन्य कामांचा ताण आहे. काही कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त पदाचा कार्यभार आहे. त्यामुळे भरपाई वेळेत मिळत नाही. दोडामार्ग वनक्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची बरीचशी पदे रिक्त असून, सध्या तेथील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे समजते. या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने रिक्त पदांवर त्वरित नेमणुका कराव्यात; तसेच हत्तीचा वावर असेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द कराव्यात, वन कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द न झाल्यास १५ जून रोजी आंदोलनासारखा मार्ग निवडावा लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा