चोरटे सीसीटीव्हीत कैद : तासाभरातच बांदा पोलीसांकडून संशयित ताब्यात
बांदा
बांदा बाजारपेठेत आज आठवडा बाजारात मध्यप्रदेशातील दोन भामट्यांनी मुंबईतील चाकरमान्यांचे पाकीट लंपास केले. कट्टा कॉर्नर येथील नाना शिरोडकर यांच्या भुसारी दुकानातील गर्दीचा फायदा घेत या चोरट्यांनी पाकीट लंपास करुन तेथून पोबारा केला. वाफोली येथील त्या वृद्ध चाकरमान्यांना काही वेळातच पाकीट नसल्याचे लक्षात आले. शिरोडकर यांच्या दुकानातील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्या भामट्यांनी पाकीट चोरल्याचे निश्चित झाले. त्यानंतर बांदा पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दोन्ही चोरटे स्पष्ट दिसत होते. गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरुन पिशवीत टाकून पलायन करीत असल्याचे निदर्शनास आले.
बांदा पोलीस कर्मचारी विठोबा सावंत व वाहतूक पोलीस विजय जाधव यांनी तातडीने त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनवर आणले. संशयित चोरटे पोलीसांना विसंगत माहिती देत होते. निहाल गुजर (१४) व अभय सोलंकी (१६, दोघेही रा. हवाबंगला, इंदौर, मध्यप्रदेश) अशी आपली नावे असल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितली. काही वेळातच पाकीट चोरीस गेलेले वाफोलीतील मुंबईस्थित वृद्ध दाखल झाले. पाकिटातील पैसे व कागदपत्र मिळाल्यानंतर पोलीसांत रीतसर तक्रार देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
आपण उद्या मंगळवारी मुंबईत जात असल्याने कोर्ट कचेरीसाठी आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगत आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्या भामट्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. त्यांचे अाणखी काही साथीदार बाजारपेठेत असण्याची शक्यता बांद्यातील व्यापार्यांनी व्यक्त केली. दोडामार्गात आपली मामी राहते. तिच्याकडेच आपण जात होतो असेही ते पोलीसांना सांगत होते. त्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. बाजारपेठेत येणाऱ्या सर्व नागरिकांनी पैसे व दागिने सुरक्षीत ठेऊन खरेदी करावी असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.