आ.वैभव नाईक यांच्या मागणीची महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०२०-२१ करीता वाळूची प्रतिब्रास हातची किंमत निश्चित करण्यासाठी राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवार दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक राज्यमंत्री महोदयांच्या मंत्रालयातील दालनात होणार आहे. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूची प्रतिब्रास हातची किंमत अधिक प्रमाणात असल्याने वाळू परवाना धारक हे परवाना पध्दतीमध्ये सहभाग घेत नाहीत.त्यामुळे ही किंमत कमी करून वाळू परवाना धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन ना.अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची प्रतिब्रास हातची किंमत निश्चित करण्यासाठी आपल्या दालनात बैठक आयोजित केली आहे.