*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश*
कुडाळ :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागुन असलेल्या झाराप-माणगाव मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला अखेर शनिवार पासून सुरुवात करण्यात आली असून याबाबत जिल्हा परिषद उपअभियंता कुडाळ यांच्याकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला आठ दिवसांत यश आले आहे. दरम्यान सदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात समाधानकारक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील झाराप-माणगाव हा रस्ता माणगाव खोऱ्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र त्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे सदर मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. असे असताना बांधकाम विभागातील इंजिनियर यांच्याशी अनेक वेळा संपर्क केला असता सदर रस्ता खडीकरण-डांबरीकरणासाठी मंजूर झाला असून हे काम त्वरित सुरू करण्यात येत आहे, अशा प्रकारची केवळ आश्वासने दिली जात होती. मात्र प्रत्यक्षात कृती केली न झाल्याचे निदर्शनास आल्यावर झाराप-माणगाव रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसांत बुजवण्यात यावे, अन्यथा ते पावसाळ्यात उखडून टाकण्यात येतील अशा इशाऱ्याचे निवेदन माणगाव वासियांतर्फे जिल्हा परिषद उपअभियंता कुडाळ यांना १७ मे २०२२ रोजी देण्यात आले, त्याची दखल घेऊन २८ मे २०२२ रोजी पासून सदर मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमधून नाराजीचा सूर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसुन येत आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या पाठपुराव्याला यश आल्याचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी म्हणाले.