You are currently viewing बिळवस ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकाम कागदपत्रात हेराफेरी

बिळवस ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकाम कागदपत्रात हेराफेरी

*ग्रामस्थांचा घरपट्टी न भरण्याचा निर्णय; भास्कर आंगणे यांचे प्रसिद्धी पत्रक*

 

मालवण (मसुरे) :

बिळवस ग्रामपंचायतीच्या नवीन बांधकाम हे योग्य कागदपत्रांच्या आधारावर तसेच बिळवस आंगणेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठरवून दिलेल्या नियोजित जागेत न केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या इमारतीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची हेराफेरी झाली आहे, इमारत बिळवस गावात नेण्याच्या कारस्थानात अप्रत्यक्षपणे सहकार्य करून प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आम्ही निषेध करीत असून असहकार पुकारून या आर्थिक वर्षापासून घरपट्टी न भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी प्रसिद्ध झालेल्या पत्रकातून दिली आहे.

अंगणवाडी – भोगलेवाडी – बिळवस या तीन गावांची मिळून ‘बिळवस ग्रामपंचायत’ या नावाने अंतराच्या निकषांवर आधारित स्वतंत्र ग्रामपंचायती ची निर्मिती होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला. परंतु विकासकामे तर दूरच मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी आणि वीज या बाबतीतही प्रगती शून्य आहे. या तीन वर्षात विद्यमान सरपंच यांनी काही ग्रामपंचायत सदस्य आणि आंगणेवाडी, भोगलेवाडी ग्रामस्थांची दिशाभूल केली.

आंगणेवाडी – भोगलेवाडी या दोन गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता तीनही गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत इमारतीसाठी ठरवलेली पूर्व नियोजित जागा बेकायदेशीररित्या बदलून ती इमारत बिळवस गावात नेली. स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा मूळ उद्देशच पार धुळीला मिळवला. हे शक्य झाले ते शासकीय अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने हे विसरून चालणार नाही, असा आरोप आंगणेवाडी आणि भोगलेवाडीच्या ग्रामस्थांनी अध्यक्ष भास्कर आंगणे, गजानन (बाबू) आंगणे, नंदू आंगणे, दीपक आंगणे, शशी आंगणे प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा