You are currently viewing जगदीश्वरबाला

जगदीश्वरबाला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

*वि दा सा*
*जगदीश्वरबाला*
*(२+६+ऽऽ+८+४)*

ये भूवरि ये ऽऽ उतर मातृभूमीसी
का अंत असा ऽऽ अरे विदासा बघसी ।।धृ।।

तू चेतविता ऽऽ वह्नि ऐकला होता
जनहितकारक ऽऽ वणवा बघता बघता
परदास्यत्वे ऽऽ शृंखलाबद्ध माता
धडपडलासी ऽऽ तिज सोडविण्या करिता
तुज छलकपटे ऽऽ अडकवित आप्त गोरे
निजजनास तू ऽऽ मुकशी घर अन दारे
आणीता तुज ऽऽ करुनी बंदीवासी
का अंत असा ऽऽ अरे विदासा बघसी।।१।।

तू ओळखला ऽऽ डाव राज्यकर्त्यांचा
मग विचार ये ऽऽ सुटण्याच्या यत्नांचा
शौचकुपातुन ऽऽ सागरि झेपावूनी
फ्रान्सतीरास ऽऽ पोचलास रे तरुनी
सैनिक तुजला ऽऽ धरती करती बंदी
अडकलास तू ऽऽ खग भ्रमता स्वच्छंदी
आजन्म तुला ऽऽ धाडित कारावासी
का अंत असा ऽऽ अरे विदासा बघसी।।२।।

अंदमानात ऽऽ अंधगृहे कोंडीता
शृंखलेत तुज ऽऽ घाण्यासी जोडीता
डगमगला नच ऽऽ महाकाव्य तू रचिली
प्रतिकूलाते ऽऽ प्रतिभा बुद्धी जपली
बहु यत्नाने ऽऽ कारागृहात वसता
स्थानबद्धास ऽऽ रत्नागिरीत येता
लोकसेवेत ऽऽ वेचित आयुष्यासी
का अंत असा ऽऽ अरे विदासा बघसी।।३।।

स्वातंत्राते ऽऽ हिन्दुस्थाना प्राप्ता
हळहळलासी ऽऽ दुभागता ती माता
जन आंदोलन ऽऽ उभारि धर्मासाठी
जात्युच्छेदन ऽऽ जन जन जोडी पाठी
सामान्यजना ऽऽ हिन्दुहृदयिचा राणा
स्वातंत्र्यवीर ऽऽ हिन्दुत्वाचा बाणा
आठवण पुन्हा ऽऽ ये तुझी आजमितिसी
का अंत असा ऽऽ अरे विदासा बघसी।।४।।

— हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा