You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य..

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख

स्वातंत्र्यवीर सावरकर हे जहाल क्रांतीकारकच होते की
समाजसुधारकही होते या विषयावर अनेक वादविवाद
चर्चा यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र जेव्हां जेव्हां मी त्यांच्याविषयीचं लेखन वाचते ,तेव्हां मला जाणवतं की
सावरकर हे असे एकमेव स्वातंत्र्ययोद्धा होते की त्यांना दोन वेळा जन्पठेपेची शिक्षा झाली आणि नंतर पुन्हा राष्ट्रीय जीवनात ते क्रियाशील राहिले.विद्यार्थी असताना त्यांनी इंग्लंडच्या राजाप्रती निष्ठावान असण्याची शपथ नाकारली.त्यांच्या पुस्तक प्रकाशनावर बंदी आणली गेली .त्यांची पदवी काढून घेण्यात आली.राष्ट्रध्वज तिरंगावर धर्मचक्र लावण्याचा त्यांनी आग्रह धरला आणि राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांनी तो मानलाही.भारताचे संपूर्ण
स्वातंत्र्य हे त्यांचे लक्ष्य होते.ते असे क्रांतीकारी होते
की त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा चिंतनशील विचार केला.बंदीवासातून परतल्यानंतर त्यांनी अस्पृश्यता आणि समाजातल्या कुप्रथांविरुद्ध जागर केला.
त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विवीध पैलु आहेत.महान देशभक्त,
झुंजार स्वातंत्र्यसेनानी,जहाल क्रांतीकारक,प्रतिभाससंपन्न कवी,विज्ञानवादी,हिंदुत्ववादी.
भाषाशुद्धीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक..
मात्र कर्ते समाजसुधारक ही त्यांची प्रतिमा अधिक मोलाची वाटते.
त्यांनी स्वत:च प्रतिपादन केले होते,की “एकवेळ मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल पण
माझा सामाजिक विचार त्यांनी विसरु नये.”
त्यांना विज्ञाननिष्ठ,पोथीमुक्त आणि ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता.त्यांची
हिंदुत्ववादाची बौद्धिक व्याख्या वेगळी होती.या भूमीला पितृभू आणि पुण्यभु मानणारे सर्व पंथीय हे हिंदुच असे ते म्हणत.मनुस्मृती वेदग्रंथ हे अभ्यासनीय आणि आदरणीय आहेत पण ते अनुकरणीय नाहीत असे त्यांचे परखड मत होते.धर्मग्रंथांना ते मानवनिर्मीत मानत.
मात्र विज्ञानग्रंथ हेच त्यांना धर्मग्रंथ वाटत.
हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून विज्ञानयुगात आणून सोडणे हे त्यांना त्यांचे केंद्रीभूत कर्तव्य वाटायचे.त्यांनी शुद्ध इहवाद मांडला.ते गाई बैलांना उपयुक्त पशु मानत.मात्र गाय ही बैलाची माता आहे ,मनुष्याची नव्हे अशी ते गायीबद्दलच्या श्रद्धेची
चिकीत्सा करत.यज्ञाने पाउस पडतो हे साफ खोटे आहे ,यज्ञात तुपाचा एकही थेंब वाया घालवू नका ,असे ते कळवळून सांगत.आणि या अंधश्रद्धेच्या बेड्या तोडण्यावर त्यांचा भर होता.
तेरा वर्षाच्या बंदीवासाच्या काळात त्यांनी सखोल समाज चिंतन केले .अंदमानच्या कारागृहातील भींतीवर त्यांनी
बाभळीच्या काट्याने प्रेरणादायी काव्ये लिहीली.त्यांचा हिंदुत्ववाद हा बंदीस्त नव्हता.तो व्यापक आहे.सवर्णांचे
प्रबोधन आणि दलीतांमधे जाणीवजागरण हे तत्व महत्वाचे होते.
आंबेडकरांचे व्यक्तीमत्व,विद्वत्ता,नेतृत्व संघटन कौशल्य,
समाजजागृतीचे कार्य हे राष्ट्राचे धन आहे असे त्यांनी म्हटले होते.
सावरकरांचे हिंदुत्ववाबद्दलचे ,हिंदु राष्ट्रवादाचे विचार
हे वादग्रस्त असतील पण त्यांचे विज्ञानवादी ,सुधारणावादी ,इहवादी विचार त्यांच्या अनुयायांनाही पेलले नाहीत.पण त्यांचे हे विचार सगळ्यांनी स्वीकारले ,त्यादृष्टीने पावले उचलली तर जग
सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने मार्गस्थ राहील असा विश्वास वाटतो.
सावरकरांच्या संपूर्ण जीवनकार्यातला हा विज्ञानवाद
अत्यंत महत्वाचा आहे.
अशा ह्या क्रांतीवादी ,सुधारणावादी,कवी मनाच्या थोर साहित्यिकाला आदरपूर्वक
वंदन !!!!

 

राधिका भांडारकर
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा