सिंधुदुर्गनगरी
प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप वीक 2022 चे आयोजन करण्यात येत आहे. स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअपची नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्यजकता मार्गदर्शन अधिकारी कृ.वि. कविटकर यांनी सांगितले.
या वीक अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अव्वल 100 स्टार्टअपना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते. यातील 24 विजेत्यांना त्यांची उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्वावर शासकीय विभागासोबत राबविण्यासाठी कार्यादेश दिले जातात. यामध्ये कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता आणि संकिर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे.
यामध्ये सहभागासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे. इच्छूकांनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा teammsins.in अथवा 022-35543099 येथे संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.