मांज्याच्या वापरास प्रतिबंधासाठी टास्कफोर्सची नियुक्ती
सिंधुदुर्गनगरी,
जिल्ह्यात प्लास्टिक, सिन्थेटिक पासून बनवलेल्या नायलॉन मांज्यामुळे पक्षी व मानवी जिवीतास दुखापती होत असल्यामुळे अशा मांज्याचा वापर, विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे. या टास्क फोर्सचे प्रमुख हे अपर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे हे असून सहाय्यक प्रभारी म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहणार आहेत. टास्क फोर्समध्ये पोलीस ठाणे स्तरावर एक टिम तयार करण्यात आली असून त्याध्ये 2 पुरुष पोलीस अंमलदार व 1 महिला पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आली आहे.
टास्क फोर्स टिममध्ये नियुक्त केलेले पोलीस अधिकारी व अंमलदार हे स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने अचानक दुकानांना भेटी देणे, नायलॉन मांजा आढळल्यास कायदेशीर कारवाई करणे, नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री होत असल्यास सायबर सेलला माहिती देणे या प्रकारे कामकाज करणार आहेत.
जिल्ह्यात अशा प्लास्टिक, सिन्थेटिकपासून बनवलेल्या नायलॉन मांज्याचा वापर, विक्री, ऑनलाईन विक्री होत असल्यास त्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास द्यावी असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.