जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य निवृत्त पोलीस अधिकारी ज्येष्ठ लेखक कवी वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना
कमळ घड्याळ बाण
नको दाखवू तू पंजा
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
याचा झेंडा त्याचा झेंडा
फक्त झाला झेंडाधारी
देव तुझा एसी मध्ये
तू फिरतो रस्त्यावरी !!
तुह्याच जिवावरती
तोच मारतोय मंज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
सात पिढ्याची कमाई
पाचच वर्षात केली
तुही आख्खी रे जवानी
मागे फिरू फिरू गेली !!
तू झालास भिकारी
आन तो झाला रे राज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
त्याचे सारे पोरं सोरं
शिकून झालेत मोठे
आन तुहये पोरं गड्या
मारती दंगलीत गोटे !!
ते जातात परदेशी
तुम्ही भोगताय सज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
भाऊ दादा नाना काका
सारे देती तुले धोका
तू फिरतो गध्यावाणी
ना घरका ना घाटका !!
ते गेले मुंबई दिल्ली
तू पिपयावरला मुंज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556