शिवसेनेच्या दणक्यानंतर टोल कार्यालय केले बंद
संदेश पारकर टोलमाफीसाठी आक्रमक
सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोलमाफीतुन सुट मिळत नाही तोपर्यंत टोल कार्यालय सुरु होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेवुन आज पुन्हा संदेश पारकर यांनी टोल कार्यालयाला धडक देत कार्यालय बंद पाडले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर पांधरकर यांची भेट घेवुन चर्चा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमएच-07 गाड्यांना टोलमाफी मिळावी अशी प्रमुख मागणी संदेश पारकर यांनी केली आहे. याबरोबरच एनएच-66 चे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करु नये, खारेपाटण पुल, नांदगाव, वागदे सर्व्हिस रोड पुर्ण करावा तसेच इतर सर्व कामे पुर्ण पुर्ण करावी, टोलच्या दोन्ही बाजूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांना सर्व्हिस रोड द्यावेत, भूसंपादन पुर्ण करावे या मागण्या देखील संदेश पारकर यांनी केल्या. तसेच ज्या जागेत टोल आहे तेथील काही लोकांना अजुनही मोबदला दिला गेला नाही. हा मोबदला देखील लवकर द्यावा हि मागणी देखील संदेश पारकर यांनी यावेळी केली.
कणकवली शहरातील रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे देखील पर्यायी जागेत स्थलांतर व्हावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जर टोलमाफी नाही मिळाली तर स्वतः टोलनाक्यावर उभा राहुन शिवसैनिकांच्या सोबत टोलवसुली करणाऱ्यांना हुसकावून लावण्यात येईल असा सज्जड दम संदेश पारकर यांनी प्रोजेक्ट मॅनेजर यांना भरला. त्यानंतर टोलवसुली कार्यालय त्वरीत बंद करण्यात आले.