बंदर निरीक्षक…संशोधनाचा विषय
पर्यटनाच्या गोंडस नावाखाली विनापरवाना बोटिंग क्लब
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या गोंडस नावाखाली समुद्रात होणारे अनधिकृत बोटिंग…अत्यंत आवश्यक असणारे लाईफ जॅकेट आदी सुरक्षा साधनांचा अभाव यामुळेच तारकर्ली बोट दुर्घटनेसारखी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील अनेक बोटिंग क्लब विनापरवाना समुद्र सफारी, बोट रायडिंग, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग सारखे साहसी प्रकार पर्यटकांसाठी उपलब्ध करून देतात. समुद्राखालील जग पहावं म्हणून कधीही समुद्र न पाहिलेले पर्यटक आपल्या चिमुरड्या मुलांना देखील घेऊन त्यात सहभागी होतात. परंतु कमी पैशात कसल्याही सुसज्ज सुरक्षा व्यवस्था न करता पैसे मिळविणे एवढ्याच उद्देशाने बोटिंग क्लब वाले पर्यटकांचा जीव धोक्यात आणतात आणि कधीतरी लांडगा आला रे आला सारखी परिस्थिती होते आणि निष्कारण पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोटिंग म्हणजे पर्यटकांच्या जीवांशी खेळ बनले आहे. मेरिटाईम बोर्डाकडून बोटिंग साठी लागणारे परवाने सहजासहजी मिळत नसल्याने , अनेक जाचक अटी यामुळे कित्येक बोटिंग क्लब अनाधिकृतरीत्या बोटिंग व्यवसाय करतात. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक मालवण, वेंगुर्ला आदी समुद्र किनाऱ्यावर येतात. गोव्यातील पर्यटक देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वस्त बोटिंग म्हणून गोव्यातून सिंधुदुर्गात येतात. गोव्यात 3500 रुपये एका पर्यटकांसाठी मोजावे लागतात तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 700 ते 800 रुपयात स्कुबा डायव्हिंग सारखे साहसी खेळ करायला मिळतात. आणि येण्याजाण्याचा खर्च देखील एजेंट करतात…परंतु गोव्यात संपूर्ण सुरक्षा राखून हे प्रकार केले जातात, बोटिंग क्लब देखील अधिकृत आहेत… आणि सिंधुदुर्गात अनधिकृत बोटिंग क्लब आणि सुरक्षेची हमी नाही, त्यामुळे साहसी बोटिंग स्वस्तात करायला मिळते. गोव्यातील एजेंट गोव्यातून पर्यटकांना जिल्ह्यात आणतात आणि एजेंट व पर्यटन व्यावसायिक दोघेही मालामाल होतात…त्यात बंदर अधिकाऱ्यांचीही चांदीच असते. अधिकृत बोटिंग कडून सरकारला उत्पन्न मिळते, पण अनधिकृत बोटिंग कडून अधिकाऱ्यांना उत्पन्न मिळते, त्यामुळे “तेरी भी चूप मेरी भी चूप” अशाप्रकारे मिलीभगत होऊन अनधिकृत बोटिंगचे व्यवसाय तेजीत सुरू आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत बोटिंग क्लब मध्ये अधिकाऱ्यांचीही विना परवाना बोटी?
मालवण हुन बदली होऊन गेलेल्या एका बंदर निरिक्षकांच्या घरातील व्यक्तीचा देखील मालवण मध्ये बोटिंग प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे इतर बोटिंग प्रकल्प देखील विनासायास अनधिकृतपणे बोटिंग व्यवसाय करतात. पावसाळी हंगामात 26 मे 2022 पासून बोटीतून प्रवासी वाहतूक बंद करण्याबाबत बंदर निरीक्षक मालवण यांनी आदेश काढले होते. 25 मे हा शेवटचा दिवस होता आणि 24 तारीखलाच नशिबाचे फासे उलटे फिरले आणि तारकर्ली येथे बोट दुर्घटना घडली. पर्यटन बोटिंग दुर्घटना घडताच प्रशासन हादरले तसेच बोटिंग व्यावसायिक देखील मदतीसाठी पुढे सरसावले. काहींनी पर्यटकांच्या मृत्यूस मालवण हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर नसणे जबाबदार म्हटले आहे, परंतु येथे आताचे सत्ताधारी असो वा पूर्वीचे सर्वच राजकारणी जबाबदार आहेत, कारण जिल्हा पर्यटन जिल्हा होऊनही अपुऱ्या सोयीसुविधा आहेत, त्यामुळे एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. स्कुबा डायव्हिंग साठी नेलेल्या पर्यटकांना लाईफ जॅकेट का दिली नव्हती? बोटिंग क्लब कडे अधिकृत परवाना होता का? दुर्घटना घडल्यावर पोलीस प्रशासन जागे झाले आहे, अधिकृत परवाना व लाईफ जाकीट नसणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत, परंतु हेच जर आधीपासूनच केले असते तर दोन निष्पाप जीव वाचले नसते का? संवाद मीडियाने यापूर्वी अनधिकृत बोटिंग बाबत आवाज उठवला होता परंतु त्यावेळी प्रशासन निद्रिस्त होते. त्यामुळेच आज पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी, नाचक्की झाली आहे. उद्या दिनांक 26/5/22 पासून पावसाळी हंगामासाठी प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येत असल्याचे आदेश दिले गेले आहेत, त्यामुळे आतातरी प्रशासन कडक भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.