भाजपचे नगरसेवक अभिषेक गावडे आणि भाजप शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
कुडाळ
कुडाळ उपजिल्हा रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व एक्सरे टेक्नीशियन नेमा, अशी मागणी भाजप नगरसेवक अभिषेक गावडे आणि भाजप शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यात 72 खेडेगाव आहेत आणि कुडाळ शहर मध्यवर्ती ठिकाण असून येथे उपजिल्हा रूग्णालय आहे. परिसरातील आजूबाजूचे सर्व गरीब रूग्ण या रूग्णालयामध्ये उपचार घेतात. साधारणतः दर महिन्याला 100 प्रसुती रूग्ण उपचारासाठी या आधी यायचे. आता चार महिने स्त्रीरोग तज्ञ नसल्यामुळे हे रूग्ण खाजगी किंवा ओरोस किंवा सावंतवाडी ग्रामीण रूग्णालयात दाखल होतात. खासगी रूग्णालयात नैसर्गिक प्रसुतीसाठी साधारणतः दहा हजार रूपये व सिझर प्रसुतीसाठी साधारणतः वीस हजार रूपये खर्च करावा लागतो. हा खर्च सर्व सामान्य रूग्णांना परवडणारा नाही.
याला जबाबदार कुडाळ-मालवणचे आमदार सन्मा.श्री.वैभव नाईक जबाबदार आहेत. यापुढे पावसाळा असल्यामुळे या रूग्णांना ओरोस किंवा सावंतवाडी मध्ये मोफत प्रसुतीसाठी ग्रामीण रूग्णालयात जाणे कठीण होणार आहे.
दिनांक 28 एप्रिल 2022 सौ. रेनू आयंष जाटव ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. सदरच्या रूग्णाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण आपल्या कुडाळमधील उपजिल्हा रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डाॅक्टर नसल्यामुळे कुडाळच्या डाॅक्टरने सावंतवाडी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यास सांगितले. सदरचा रूग्ण रूग्णवाहिकेतून सावंतवाडी येथे जात असताना पिंगुळी दरम्याने रूग्णवाहिकेतच प्रसुती झाली. सदरच्या रूग्णाचे दैव बलवत्तर म्हणून सदरचा रूग्ण व बाळ बचावले. असे अनेक प्रसंग या आधी घडले असतील.
त्यामुळे आपल्याला विनंती आहे की, कुडाळ उपजिल्हा रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डाॅक्टर व एक्सरे टेक्नीशियन पुढील 7 दिवसात नियुक्त करावेत. अन्यथा ग्रामीण रूग्णालयासमोर नागरीकांना घेवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन करताना शासकिय नियमांचे उल्लघन झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे,ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे,नगरसेवक अभिषेक गावडे,नगरसेवक निलेश परब,सरचिटणीस राजा पडते,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर,कुडाळ मंडल युवा मोर्चा उपाध्यक्ष चंदन कांबळी,ओरोस मंडल युवा मोर्चा ज्ञानेश सरनोबत,युवा मोर्चा पिंगुळी चिटणीस साईराज दळवी,अमेय सावंत सह आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते