बोटमालक, बोटचालकासह इतरांचा समावेश : दुपारी न्यायालयात हजर करणार
मालवण
तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात मंगळवारी दुपारी स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग) यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करून सर्वाना अटक केली आहे. याबाबत या बोटीतील पर्यटक लैलेश प्रदीप परब ( वय ३६, रा. अणाव कुडाळ) यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तारकर्ली समुद्रात गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट लाटांच्या तडाख्याने पलटी होऊन बोटीतील सुमारे २८ जण समुद्राच्या पाण्यात फेकले जाऊन दुर्घटना घडली होती. यात अकोला येथील आकाश भास्करराव देशमुख व पुणे येथील डॉ. स्वप्नील मारुती पिसे या दोन पर्यटकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. तर अन्य पर्यटक जखमी झाले होते. या प्रकरणी पर्यटक लैलेश परब यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यावर रात्री उशिरा बोट मालक, चालक व अन्य स्कुबा डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (वय २३, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (वय ३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडेकर (वय ३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (वय ५४, रा. देवबाग) यांच्यावर भादवि कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, २८०, २८२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नरळे हे अधिक तपास करीत आहेत