*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना*
*भाजीवाली*
*वृत्त—उद्धव(२+८+२+२=१४)*
ती घेउन येता भाजी
भरलेली ताजी ताजी
मी मनात नसता राजी
पण डाळ शिजेना माझी
ती दावी वांगी कोबी
मग बळेच मेथी कोंबी
ना नकोच म्हणता थांबी
घ्या पडवळ मोजुनि लांबी
तो कंद आणि तरकारी
ती गळ्यात माझ्या मारी
मज ग्राहक करुनी भारी
मी मोजत पै पै सारी
घर येता जड हो पिशवी
कर दुखती खांदे हलवी
सौ नाक मान ती वळवी
धड एक काम ना म्हणवी
मग एक मास हो पुरता
दिस रात्री वांगे भरता
ती फोडी रस्सा करता
मज निमूट खाणे प्राप्ता
त्या आठवणीने अजुनी
मी जातो रस्ता टळुनी
तिज कडे कटाक्षे दुरुनी
ना पाहे मागे वळुनी
—हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई.