You are currently viewing शब्दांच्या पलीकडले …

शब्दांच्या पलीकडले …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

तशी भारतभर आम्ही भ्रमंती केली. दार्जिलिंग गंगटोक
नथूला पास बॅार्डर कन्याकुमारी कोलकत्ता स्वामी विवेकानंद
मठ, मध्य प्रदेश १४ दिवस, काश्मिर , मुंबई …निवांतपणे,ओरिसा इ. इ. पण दार्जिलिंगच्या रस्त्यावरून जेव्हा
आमची बस जात होती तेव्हा पहाडावरील सारी घरे पाहून मी
सुन्न व नि:शब्द झाले. नुसता तोंडाचा” आ “वासून राहिला माझा. काय बोलावे …? सारे शब्दांच्या पलीकडले होते हो!
अहो, तिथे इंचभरही सपाट जमिन नाही. फक्त पहाड आणि
पहाड.. सारी वस्ती घरे शेती वाडी सारे डोंगरावरच! संध्याकाळी दिवे लागले नि मी तर साक्षात स्वर्गातच पोहोचले.
अहो, काय सांगू तुम्हाला, पहाडावरील घराघरातून व रस्त्यांतून
दिवे लागताच मी स्वर्गात असल्याचाच मला भास झाला यात
जरा ही अतिशयोक्ती नाही.डोंगरावरून दिव्यांच्या माळा सोडून
जणू दिवाळी अवतरल्याचा भास होत होता इतके सुंदर ते
रात्रीचे दार्जिलिंग दिसत होते .ते दृश्य शब्दात पकडणे केवळ
अवघडच नाही तर अशक्य .. म्हणजे, शब्दांच्या पलीकडेच!
अजूनही इतक्या वर्षा नंतर ते दृष्य मी विसरले नाही.लोकांचा
सारा व्यवहार जास्त करून पायीच . वाहने अगदीच नगण्य.
कामावरून घरी जाणारी माणसे डोंगर चढूनच घरात प्रवेश
करतात .

 

नथूला पास भारत चिन बॅार्डर कडे १४००० ते १६००० फूट
उंचावर जातांना ही हाच अनुभव आला. रस्ते इतके कठीण की
आपल्याकडील ड्रायव्हर त्या रस्त्यांवरून गाडी न्यायची हिंमत
दाखवूच शकत नाही. मानलं पाहिजे तिथल्या लोकांना रस्ते
नसलेल्या जागांवर ते सफाईदार पणे गाडी चालवतात.आपल्या हृदयाचा ठोका चुकतोच .. सारे शब्दात
न सांगता येणारेच .. त्याचा अनुभवच घ्यायला हवा ..!आणि
वर १६००० हजार फुटांवर गेल्यावर तर ..” स्वर्गाचे दारच
उघडले”! बर्फाच्छादित शिखरे नि जमिनीवरही बर्फाचे ढीग व
त्यातून फक्त चाके जातील एवढाच रस्ता.. अहा ! काय वर्णावी कशी वर्णावी ती शोभा? नेत्रांचे पारणे फिटणे म्हणजे
काय? याचा साक्षात प्रत्यय आला व आम्ही सारे मूक झालो.

 

तिथे १४००० फुटांवर शहिद झालेल्या एका सरदारजींची समाधी आहे.टेंट सारखेच काहीतरी आहे त्यात त्यांचे सारे
सामान व बंदुका ही आदराने ठेवलेल्या आहेत. इतकी वर्षे
झाली तरी रात्रीची त्यांची नियमित गस्त असल्याचा साऱ्यांचा
विश्वास आहे. त्यांचे पेन्शन नियमित पणे त्यांच्या घरी पेहोचवले जाते. टूर वाले व तेथिल सैनिक नित्य त्यांचे दर्शन
घेतात .. ह्या श्रद्धेला तुम्ही कुठल्या शब्दात बांधणार ?
तेथे सारेच “ शब्दांच्या पलीकडे आहे” ….नथूला पासला
भारत चिन चौक्या आहेत, आपापले राष्ट्रध्वज आहेत,आम्ही
त्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानां
समोर मूक व नि:शब्द झालो पुन्हा पुन्हा….! वरून खाली येतांना पुन्हा स्वर्गाच्या पायऱ्या उतरल्याचा भास होत होता.
समोरच निळेशार पाणी असलेला नि:शब्द तलाव , हो, एवढ्या
जीवघेण्या थंडीत कोण तिथे जाणार ? दृश्य मात्र खूपच मनोहर .! तो तलाव पहात पहात, घरांवर साचलेले बर्फ पाहून
कसे बरे हे लोक राहतात हा मनाला प्रश्न पडला.तेवढ्यात
काही”याक “ दिसले. पर्वतीय प्रदेशात सामानाची ने आण
करणारे दमदार मित्रच जणू.. इथे उंचावर सारेच शब्दांच्या
पलीकडे आहे हो!

 

रस्त्यावरची बर्फ पांघरलेली चिनारची झाडे म्हणजे शुभ्र शाल
पांघरलेले साधू संतच जणू! मूक नि:शब्द निसर्गाची साधना
करणारे महापुरूषच ! गाडीतून खाली उतरलो तर …?
अहा, सुखद असा बर्फ वर्षाव होऊ लागला व आम्ही जणू
रस्त्यावरचे चिनारच बनलो. शुभ्र वसन धारी! हा बर्फ अंगावर
टिकत नाही, ते गोळे झटकल्या बरोबर खाली पडतात.मी
आडोशाला एका दुकानात शिरले व थोडी खरेदी केली.
हे सारे वर्णन मी करते आहे पण वाटते आहे, खरोखर माझ्या
कडे शब्द आहेत का हे वर्णन करायला? हे तर शब्दात न
मावणारे, शब्दांच्या पलिकडचे आहे. मी अगदीच असमर्थ
आहे ते शब्दात बांधण्या साठी!

भारतात असे शब्दांच्या पलिकडले खूप आहे. मला वाटते त्या
साठी नवी परिभाषाच निर्माण व्हायला हवी.किंवा एखादा पट्टीचा लेखक त्याला शब्दात बांधू शकेल. मी पामर काय
वर्णन करणार त्याचे!खूप आहे लिहिण्या सारखे, पण …
तुम्ही कंटाळाल म्हणून थांबते …

खूप खूप धन्यवाद …

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ मे २०२२
वेळ : रात्री ११ : 33

प्रतिक्रिया व्यक्त करा