“का”लावल माळरानात आजपासून मांडणार जुगाराची पाले…
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या जुगारावरील धडक कारवाईनंतर जिल्ह्यातील जुगाऱ्यानी गोवा हद्दीवरील पेडणे परिसरात आपला संसार थाटला होता, परंतु जिल्ह्यातील पोलीस कारवाई शांत झाल्याची संधी साधून खाकी वर्दीच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून जुगार्यांनी “का”लावल च्या माळरानावर जुगाराच्या मैफिलीचे आयोजन केले आहे.
“का”लावल माळरानात दुपारी 3.00 वाजल्यापासून गोवा, सिंधुदुर्ग आदी भागातील मोठमोठे जुगारी दाखल झाले आहेत. माळरानावर पोचण्यासाठी जुगाऱ्याकडून गाईड तैनात करण्यात आले आहेत. सहजासहजी पोलीस पोहचू नयेत असे ठिकाण निवडून रात्रभर जुगाराच्या मैफिली सजविण्याचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी सिंधुदुर्ग व गोवा येथील मोठे तक्षीमदार तैनात झाले आहेत. जुगारासाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी खाण्यापिण्याची चोख व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे पहाटेपर्यंत “का”लावल माळरानात दिव्यांच्या झगमगाटात मैफिल सजणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
जिल्ह्यातील तरुणाईला देशोधडीला लावणाऱ्या अवैध धंद्यांना दिवसेंदिवस पेव सुटत असून मटका, दारू, जुगार, अशा अवैध धंद्यात तरुणाई अडकत चालली आहे. अनेकांनी नोकऱ्या सोडून जुगारात नशीब आजमावले आणि स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे. गावागावात सुरू असणाऱ्या जुगारांवर जिल्हा पोलीस प्रमुखांनी पुन्हा एकदा मुळावर घाव घालावा अशी सर्वसामान्य माणूस अपेक्षा व्यक्त करत आहे.