तिन्ही दलांमध्ये यापुढे १८ वर्षांच्या सळसळत्या रक्ताची फौज
सेवाकाल फक्त ४ वर्षे नंतर दुसरी नोकरी करण्याची मुभा
हिंदुस्तानी लष्कर आता तरुण होणार आहे. भूदल ,नौदल, हवाईदल अशा तिन्ही दलांमध्ये यापुढे १८ वर्षांच्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांची भरती केली जाणार आहे. ती फक्त चार वर्षांसाठी असेल. पण त्या कालावधीत त्यांच्या कामगिरीवर नंतर त्यांना कायमही केले जाईल. चार वर्षानंतर त्यांना कायम करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे, या चार वर्षांत लष्करात सेवा देतानाच जवान आपले शिक्षणही पूर्ण करू शकणार आहेत.
अशा पद्धतीला टूर ऑफ ड्युटी (टीओडी) से म्हटले जाते. त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणाही केली जाणार आहे. सध्या तरी जवानांची भरती आहे त्याच पद्धतीने होईल. नंतर त्या प्रक्रियेत बदल करण्याची योजना आहे. लेखी परीक्षा पहिली घेतली जाईल आणि नंतर मैदानी परीक्षा होईल. टीओडी अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाणार ट्रेनिंग कालावधीत त्यांना दरमहा १२ ते १५ हजार रुपये वेतन दिले जाईल आणि ट्रेनिंग नंतर तो आकडा ३५ हजारांवर जाईल.
हिंदुस्तानी लष्करात सैनिक म्हणून भरती झालेली व्यक्ती पुढे सुभेदार, मेजर पदापर्यंत पोहोचते. परंतु तोपर्यंत तिने वयाची पन्नाशी गाठलेली असते. तसे पाहिल्यास लष्करात सैनिकाचे कमाल वय हे ३५- ३६ वर्षे असते. टीओडी लागू झाल्यास ही परिस्थिती बदलेल. लष्करात अधिकाधिक तरुणांचा भरणा असेल. एकंदरीत काय तर हिंदुस्थानी लष्कर हे जगातील एक तरुण लष्कर असेल. चार वर्षांच्या सेवेनंतर लष्करातून बाहेर पडून ते इतरत्र नोकरीही करू शकतील.
भविष्यासाठीही तरतूद
टीओडीअंतर्गत भरती झालेले सैनिक चार वर्षानंतर लष्करातून बाहेर पडले तर त्यांना पेन्शन किंवा वैद्यकीय फायदे मिळणार नाहीत. पण बाहेर पडताना त्यांना १२ लाख रुपये दिले जातील. त्यांना पुढे लष्करात कायम करायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी निवड मंडळही स्थापन केले जाणार आहे. चार वर्षात कर्तव्यावर असताना जवानाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे त्याची सेवा बाकी राहिली असेल तर त्याचे वेतनही दिले जाईल.