You are currently viewing कणकवली येथे उद्यापासून सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव

कणकवली येथे उद्यापासून सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव

कोकणातील उद्योजकांचा विकास साधणार; ना.राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली

कोकणातील उद्योजकांचा विकास व्हावा, कोकणात नविन उद्योजक तयार व्हावेत या उद्देशाने केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने एमएसएमई विकास संस्थान मुंबईच्यावतीने कणकवली स्टेशन रोड, उपजिल्हा रुग्णालयासमोर २१ ते २३ मे, २०२२ या कालावधीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मे रोजी दुपारी १२ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.

कणकवली येथील हॉटेल निलम्स कंटीसाईट येथे आयोजित पत्रकार परिषदेत एमएसएमई विकास संस्थान मुंबईचे डायरेक्टर पी. एम. पार्लेवार यांनी याविषयी माहिती दिली. कोकणातील लघु उद्योगांना चालना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ६० उद्योजकांचे स्टॉल उभारले जाणार आहेत. यात कोकणासोबतच इतरही भागातील लघु उद्योजकांचा समावेश आहे. हा महोत्सव २१ ते २३ मे असा तीन दिवस चालणार असून सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उद्योजकांच्या वस्तुंचे व त्यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग महोत्सवात विविध केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जसे कोकण रेल्वे, आयओसीएल, ओसीएल, एचपीसीएल, बीपीसीएल, डॉक इत्यादिचे प्रतिनिधी उपस्थित राहून सहभागी यूनिटसना त्यांच्या विक्रेता नोंदणी प्रक्रियेवर सादरीकरण करणार आहेत. तसेच त्यांना सरकारी खरेदी कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. एमएसएमई मंत्रालयच्या पीएमईजीपी मुद्रा सारख्या विविध योजनांच्या लाभार्थीना कर्ज वितरणाचा चेक व कर्जाचे मंजुरी पत्राचे वितरण उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते केले जाणार आहे.

या तीन दिवसीय मेगा इव्हेंटमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या उत्पादनांचे आणि सेवाचे प्रदर्शन केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे विक्रेता विकास संमेलन, होतकरू तरुणासाठी बँक लोन मेळावा, एमएसएमई योजनेबद्दल जागरूकता कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचा समावेश आहे. या कार्यक्रमात विविध केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सरकारी विभाग, बँका, शैक्षणिक संस्था, एमएसएमई अणि संभाव्य व विद्यमान उद्योजक यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. या महोत्सवात प्रदर्शनार्थी तथा कोकणातील उद्योजकांना सरकारी संगठनांसोबत व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे विद्यमान व संभाव्य उद्योजकांना विविध एमएसएमई योजनांची माहिती देण्यात येईल. उद्यम नोंदणी व जीरो इफेक्ट जीरो डिफेक्ट (झेड) नोंदणीची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच शासकीय ई-मार्केटप्लेसवर कार्यशाळा होणार आहे. या ३ दिवसीय महोत्सवाला भेट देऊन व्यवसाय नेटवर्किंगचा लाभ घ्यावा, विशेषतः सरकारी क्षेत्रातील अधिकाधिक व्यावसायिक संधी शोधून काढाव्यात. तसेच सर्वांनी मोठ्या संख्येत या मेगा प्रदर्शनीला भेट देऊन एमएसएमई उद्योजकांच्या स्टॉलला भेट देऊन व त्यांची उत्पादने खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे. या प्रदर्शनात व प्रदर्शना दरम्यान आयोजित विविध कार्यशाळांमधे प्रवेशही निःशुल्क असल्याची माहिती श्री. पार्लेवार यांनी दिली. यावेळी सहसंचालक राहूल मिश्रा ,व्ही. आर. शिरसाट, डी. आर. जोहरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा