गावभाग पोलिसांकडून चोरटा अटक ; चोरीतील मुद्देमाल जप्त
इचलकरंजी येथील सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात झालेल्या घरफोडीचा गावभाग पोलिसांनी गोपनीय माहिती व सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या आठ तासात छडा लावला. या प्रकरणी सराईत गुन्हेगार दीपक चंद्रकांत कांबळे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीतील ६० हजाराची रोकड व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
इचलकरंजी येथील सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात राहणाऱ्या राहुल नेमिनाथ मगदूम यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरातील सव्वालाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना गोपनीय सूत्राकडून मिळालेली माहिती आणि मेडीकल दुकानातील सीसीटिव्ही फुटेजवरुन ही चोरी पोलिस रेकॉर्डवरील दीपक कांबळे याने केल्याचे समोर आले. त्यानुसार गावभाग पोलिसांनी दीपक कांबळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्याने चोरीची कबुली दिली. दुचाकी खरेदीसाठी आपण ही चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून चोरीतील ६० हजार ३६० रुपयांची रोकड व गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली असा
सुमारे
१ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दीपक कांबळे हा सराईत चोरटा असून त्याच्यावर शिवाजीनगर ठाण्यात ४, शहापूर ठाण्यात ३ व हातकणंगले पोलिस ठाण्यात १ असे ८ घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई गावभागचे प्रभारी पोलिस निरिक्षक महादेव वाघमोडे, सपोनि आबा गाडवे, पोउनि भागवत मुळीक, गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अमर कदम, राम पाटील, नितीन ढोले, विक्रम शिंदे, आदित्य दुंडगे आदींच्या पथकाने केली.