सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेमध्ये अचंबित करणारी नैसर्गिकता आहे. जिल्हात ३५० औषधी वनस्पती, ११३ रंग देणाऱ्या वनस्पती, शंभर अतिदुर्मिळ वनस्पती तसेच १०० ते १५० वनस्पतींचा रानभाज्या म्हणून ग्रामीण जनतेच्या अविभाज्य भाग आहे.त्यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेचा होणारा ऱ्हास थांबला तरच पर्यावरण टिकेल,असा विश्वास वनस्पती तज्ञ डॉ बाळकृष्ण गावडे यांनी व्यक्त केला.
वन्यजीव सप्ताह निमित्त वाईल्ड कोकण सावंतवाडी आयोजित वेबीनार मध्ये ” सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेची ओळख” या विषयावर मांडणी डॉ गावडे यांनी केली.या वेळी डॉ गणेश मर्गज यांना प्रास्तावीक केले तसेच अध्यक्ष प्रा. धिरेंद्र होळीकर,प्रा. सुभाष गोवेकर, शिवप्रसाद देसाई, सतिश लळीत,अभिमन्यू लोंढे महेंद्र पटेकर तसेच आॅनलाईन वेबीनार मध्ये मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
यावेळी डॉ गावडे म्हणाले,पश्चिम घाट जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश असून इथे वनस्पती आणि प्राणी जैवविविधतेची रेलचेल आढळून येते.परंतु मानवाच्या विकासाच्या हव्यासापोटी शेती, औद्योगिकीकरण, दळण-वळण व शेतीचे आक्रमण हा पश्चिम घाटावर मोठा धोका ओढवताना दिसतो.
या प्रदेशामध्ये पारंपारिक शेतीची जागा व्यावसायिक शेतीने घेतल्यामुळे जंगले नष्ट होत आहेत. नागली,वरी यासारख्या डोंगर ऊतारावरील पारंपारीक पिकांची जागा अननस, आले व हळदी सारख्या पिकांनी तर काजू, कोकम ऐवजी रबराच्या शेतीचे घेतल्यामुळे डोंगर व ऊतारावरील वनसंपदा पूर्णपणे नष्ट झाली आहे, असे ते म्हणाले.
जागतिक स्तरावरील ख्यात किर्त अशा हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्या अतिसंवेदनशील परीसरां पैकी पश्चिम घाट धोक्याच्या स्थितीत येऊन पोहोचला आहे.या सगळ्या घडामोडीमूळे कित्येक प्रजाती नष्ट झलेल्या असून काही धोक्याच्या पातळीवर, चिंताग्रस्त, कमी चिंताजनक आणि दुर्मिळ होत चालल्या आहेत.या सर्व बाबींचा विचार करता युनेस्को ने पश्चिम घाट परिसर हा जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केला, डॉ बाळकृष्ण गावडे म्हणाले.
सिंधुदुर्गाचा विचार करता येथे जंगलांचे सात प्रकार पडतात त्या मध्ये समुद्र किनारपट्टीलगत वाढणाऱ्या वनस्पती यामध्ये प्रामुख्याने खाडीमध्ये वाढणारी खारफुटीची जंगले, समुद्रकिनाऱ्या लगत वाढणाऱ्या वनस्पती, भरती-ओहोटी पलीकडील वनस्पती, पाणथळ व पाणथळ परिसरात वाढणरया वनस्पती, डोंगराच्या माथ्यावर व पायथ्याशी आढळणाऱ्या वनस्पती, दमट -पर्णझडीत जंगले, अर्ध सदाहरीत व सदाहरीत जंगले, ऊकिरडे व पडीक जमीनीत वाढणाऱ्या वनस्पती, व गवताळ प्रदेश.या सर्व जंगलांच्या प्रकारात ३ हजार पेक्षा जास्त वनस्पती प्रजाती
पहावयास मिळतात, असे डॉ गावडे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचंबित करणाऱ्या जैवविविधतेच्या दृष्टीने मानवी हस्तक्षेप वनस्पतीचा ऱ्हास करत आहे, ही भविष्यात धोक्याची घंटा आहे, असे डॉ गावडे यांनी सांगितले.