इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग उत्साहात पार पडला. ११ मे ते १८ मे दरम्यान येथील माधव विद्या मंदिर येथे झालेल्या या वर्गात सुमारे ६० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनिल कुलकर्णी यांनी वर्ग कार्यवाह म्हणून काम पाहिले.
उत्तर कोल्हापूर जिल्ह्यातील १६ ते २५ वयोगटातील युवकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, कोल्हापूर शहर, हातकणंगले, वडगाव हुपरी, इचलकरंजी येथून सुमारे ६० प्रशिक्षणार्थीनी वर्गात भाग घेतला. मन, शरीर आणि बुद्धी असा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या वर्गात प्रशिक्षण देण्यात आले. सूर्यनमस्कार, योग, दंड, खेळ, घोष आदींचे प्रशिक्षण १६ शिक्षकांकडून देण्यात आले. तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्धिक वर्गही पार पडले. यात शाखा लावणे, उत्सव, प्रार्थना आदींबाबत माहिती दिली. यावेळी प्रशिक्षणार्थींची चार गणात विभागणी केली होती. वर्गात पर्यावरण आणि पाणी प्रदूषण या विषयावर चर्चासत्र झाली. मुख्य शिक्षक म्हणून राजाराम बरागडे यांनी काम पाहिले.
शिबिरात पहाटे पाच पासून ते रात्री साडे दहा पर्यंत विविध प्रकारचे प्रशिक्षणाचे वर्ग चालवण्यात आले. यासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिबीर यशस्वीतेसाठी व्यवस्थापक वरून कांकाणी, सह व्यवस्था प्रमुख महेश जोशी, यांच्यासह शहरातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.