सखोल चौकशी करण्याची जिल्हाधिकार्यांकडे मागणी…
सावंतवाडी
येथील जिमखाना मैदानावर सुरू असलेले खेळपट्टी दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने ॲड. अनिल केसरकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. दरम्यान या कामासाठी तब्बल १६ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र खेळपट्टी दुरूस्तीचे चालू असलेले एकंदर काम पहाता हा खर्च अवाजवी असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन श्री. केसरकर यांनी प्रसिद्ध दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, या खेळपट्टीच्या दुरुस्तीच्या कामा अंतर्गत ही खेळपट्टी केवळ एक फुट खणून त्या वर विट्यांचा थर रचण्यात आला व त्या थरावर माती ओढण्यात आली. या कामासाठी १६ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष कामाचा विचार केला तर हा खर्च अनाठायी वाटत असून अनेक क्रिडाप्रेमी देखील या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करत आहेत. तरी या सर्व कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.