You are currently viewing क्षमा

क्षमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती रायबागकर यांचा अप्रतिम “अंत्यओळ” लेख*

*विषय -शेवटी राहूनच गेलं*

*शीर्षक- क्षमा*

आपलं या दुनियेत पदार्पण होतं आणि शाळेत जाण्याच्या निमित्ताने आपलं पहिलं पाऊल खऱ्या अर्थाने घराबाहेर पडतं. पूर्वीपेक्षा आता तर ते वय फारच अलीकडे आलेलं आहे. आईबापांच्या सुरक्षित सावलीतून थोड्या वेळासाठी का होईना आपण या घराबाहेरच्या दुनियेत जातांना आधी रडतो आणि आपल्यासारखेच इतरही इथे आलेले आहेत हे दिसताच हळूहळू तेथे रमतो. आपल्या घरी आपणच केंद्रस्थानी असल्यामुळे पुरवले गेलेले हट्ट, होणारे लाड, मायेचा वर्षाव याची आपल्याला खूप सवय झालेली असते.

पण इथे तर आपल्यासारखेच अनेक असतात. त्यामुळे सुरू होतं देवाण-घेवाणीचं, तडजोडीचं, कट्टी-बट्टीचं एक वेगळंच व्यावहारिक शिक्षण. यातूनच मग कधी निर्माण होतात मैत्री-दोस्ती चे बंध आणि रुसवे-फुगवे भांडण-तंडणाचे तिढे…

हे सुरू झालेलं असं वातावरण आयुष्यभर आपल्यासाठी वेगवेगळ्या निमित्ताने सामोरं येत असतं. समज-गैरसमजाचं धुकं संवादाच्या उन्हाने कधी चटकन वितळतं तर कधी अबोल्याचे, अहंकाराचे काळेकुट्ट मेघ आयुष्यभर आपल्याला वेढुन राहतात आणि मग कधी कधी तर त्याचं मूळ काय होतं हेही आपण विसरून जातो.

अशावेळी खरं म्हणजे ‘सॉरी’ हा एकच शब्द पुरेसा असतो. पण इतरांजवळ त्याबद्दल कितीतरी वेळ बोलत राहण्याऐवजी आपण हा शब्द उच्चारतांना मात्र अनेकदा अडखळतो. का अडवतं तिथे आपल्याला अहंकाराचं काटेरी कुंपण? का नाही उपटून काढू शकत आपण मनातला किल्मिषाचा काटा? का ते ठसठसणारं गळू वागवतो आपण आयुष्यभर?

जैन धर्मीयांमध्ये भाद्रपद शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वर्षातून एकदा सर्वांची क्षमा मागण्याची आणि क्षमा करण्याची परंपरा आहे. यातला औपचारिक पणा जरी सोडला आणि तो कधी कधी कृतीतही उतरत नसला तरीही त्याचा उद्देश मात्र नक्कीच उदात्त होता.

खरं म्हणजे सॉरी किंवा क्षमस्व ह्या एकाच शब्दाने कितीतरी गोष्टी सुकर होतील आणि आयुष्य निर्वेधपणे चालू राहील.
कधीकधी अशा व्यक्ती या जगातूनही निघून पैलतीरावर जातात आणि एक जीवघेणी खंत मागे उरते मन व्यापून टाकणारी…म्हणून

क्षमिते सर्व प्राण्या,
प्राणी सर्व क्षमोतही मजशी
सर्व प्राण्यांची मम मैत्री, राहो न वैर कोणाशी

मी भावना जर आपण मनामध्ये सतत बाळगली आणि कृतीत आणली तर…

असं म्हणण्याची वेळ येणार नाही…अरेरे! क्षमा मागणं किंवा क्षमा करणं राहूनच गेलं…राहूनच गेलं!

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई/ पुणे
१८-२-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा