प्रमोद रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे काम मार्गी
वैभववाडी
शासनाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक वर्ष रखडलेला एडगांव तांबेवाडी येथील पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. गावचे माजी सरपंच तसेच जिल्हा नियोजनचे माजी सदस्य प्रमोद रावराणे यांच्या अथक प्रयत्नाने सदर प्रकल्प पूर्ण झाला असून ग्रामस्थांचा मार्ग सुखकर झाला आहे. या पुलाचा लोकार्पण सोहळा आदरणीय प्रमोद रावराणे यांच्या शुभहस्ते तसेच माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, एडगांव सोसायटीचे चेअरमन, शासकीय ठेकेदार सुनील रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
नदीवर पुल नसल्यामुळे अतीवॄष्टीत एडगाव तांबेवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थी, गरोदर माता व वयोवृद्ध रुग्ण यांचे पूलाअभावी प्रचंड हाल होत होते. एडगांव रामेश्वर मंदिर नजीक मोठा पुल व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थ करतं होते. संबंधित विभागाकडे निवेदने देत होते. परंतु शासनाने त्यांच्या या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष केले.
एडगांवचे माजी सरपंच व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्स श्री. प्रमोद रावराणे यांच्या अथक परीश्रमाने व नियोजनबद्ध पाठपुराव्यामुळे पूलाचे काम मंजूर होवून पुर्णत्वास गेले आहे. या पुलाचा फायदा भविष्यात करूळ व कुंभवडे या दोन गावांना देखील निश्चित होणार आहे. या पुलामुळे नदीच्या पलीकडील बाजूला असलेल्या गावातील तांबेवाडी व पाष्टेवाडी या दोन वाड्या विकासप्रक्रियेत आल्या आहेत. लोकार्पण सोहळ्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, तांबेवाडी येथील स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलेले आश्वासन जबाबदारीने पूर्ण केल्याबद्दल तांबेवाडीतील ग्रामस्थांनी प्रमोद रावराणे यांचे आभार मानले.
WhatsAppFacebookTwitterGmailShare