मित्रानेच मित्राच्या पत्नीचा केला घात; बांद्यातील युवकाला अटक
पेडणे (गोवा) :
हरमल येथे एका गेस्ट हाऊसमध्ये महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा संशयित गणेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली.
सावंतवाडीतील ३४ वर्षीय श्रेया शैलेश माडखोलकर या विवाहित महिलेचा मृतदेह खालचा वाडा-हरमल येथील एका गेस्ट हाऊसच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं सोमवारी खळबळ माजली. याप्रकरणी बांदा येथील गणेश विर्नोडकर या तरुणास रात्री उशिरा अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेला विषारी रसायन पाजून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. मात्र, शवविच्छेदनानंतरच खरं कारण समोर येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेस्ट हाऊसचा केअर टेकर मंगेश प्रजापती यांनी याविषयी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केलाय. तक्रारीनुसार, ९ मे रोजी संशयित गणेश त्या महिलेला घेऊन गेस्ट हाऊसमध्ये आला होता. या युगुलाकडे ओळखपत्र मागितलं असता, महिलेनं स्वतःचं ओळखपत्र दिलं, पण तरुणाने दोन दिवसांत पुन्हा आल्यानंतर ओळखपत्र देतो, असं सांगितलं. मात्र, १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो युवक दाराला कुलूप लावून निघून गेल्याचं दिसून आलं, असं तक्रारदाराने सांगितलं.
सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानं रूम बॉयने केअर टेकरला सांगितलं. संशय बळावल्याने त्यानं लगेच पोलिसांना याविषयी माहिती दिली. खोली उघडली असता महिला जमिनीवर निपचित पडल्याचं आढळलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुदेश नाईक, निरीक्षक विक्रम नाईक तसंच ठसे तज्ज्ञ, श्वान पथक आदींनी तपास सुरू केला.
दरम्यान त्या महिलेचं ओळखपत्र सावंतवाडी येथील पत्यावर असल्यानं आणि संशयित तरुणाने ‘गुगल पे’द्वारे रूमचं भाडं दिल्यानं संशयिताला शोधणं शक्य झालं. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा संशयित गणेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आलीए. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत महिला गणेशच्या मित्राची पत्नी असून त्यांच्यात नेमकं काय प्रकरण घडलं, याचं गुढ अजूनही कायम आहे.