इचलकरंजी/प्रतिनिधी –
राज्य शासनाच्या एनएबीएल अॅक्रीडेशननुसार इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची आमदार प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक त्या सूचनाही केल्या. राज्य शासनाने रुग्णालयासाठी एमआरआय व सिटीस्कॅन मशिन मंजूर केले आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे राज्यातील नव्हे तर देशातील एक नंबरचे रुग्णालय करण्याचा मानस असल्याचा पुनरुच्चार करत दोन वर्षापासून जो पाठपुरावा केला त्याला यश आल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून राज्याच्या आरोग्य विभागाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इमारत दुरुस्तीसाठी 13.35 कोटी आणि कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती कामासाठी 4.92 कोटी असा 18.27 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सध्या रुग्णालय इमारत दुरुस्तीचे काम सुरु आहे. एनएबीएल अॅक्रीडेशननुसार या इमारतीची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार रुग्णालच्या दुसर्या मजल्यावर न्युरो, हार्ट, आर्थोपेडीक व जनरल असे 4 आणि तळमजल्यावर अॅक्सिडेंटल व मॅटर्निटी असे 2 अत्याधुनिक मशिनरी असलेले एकूण 6 ऑपरेशन थिएटर असणार आहेत.
सन 2016 मध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले. सध्या 200 बेडचे रुग्णालय असून ते 300 बेडचे होण्यात काहीच अडचण नाही. केवळ रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान जागा शासनाच्या नांवावर अद्यापही न झाल्याने ते काम रखडले होते. त्या कामाचाही पाठपुरावा करुन ते काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच 300 बेडची मंजूरी मिळेल. रुग्णालयात एमआरआय आणि सिटी स्कॅन मशिनरीसाठी शासनाने मंजूरी दिलेली आहे. त्याचबरोबर याठिकाणी एमबीबीएस चे मेडीकल कॉलेज सुरु करण्यात येणार आहे. रुग्णालय हस्तांतरावेळी राज्य शासनाने दरवर्षी 11 कोटी रुपये रुग्णालयास देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार 55 कोटी रुपये मंजूर झाले असून शासनाकडे निधी देण्यासाठी रुग्णालयात आवश्यक अत्याधुनिक मशिनरी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे सांगत आमदार आवाडे यांनी, त्या संदर्भातील प्रस्ताव रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्रकुमार शेट्ये यांनी तयार करुन तो शासनाला पाठविला आहे. त्याचबरोबर वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांसाठीसुध्दा सर्व सुविधांनीयुक्त घरकुले बांधून दिली जाणार आहेत.
इचलकरंजी हे गोरगरीब कष्टकर्यांचे शहर असल्याने याठिकाणी राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. एमआरआय आणि सिटी स्कॅनची सुविधा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांना मोफतपणे दिली जाणार आहे. तर बाहेरुन रेफर होणार्या रुग्णांना अत्यंत माफक दरात ही सुविधा मिळणार आहे. सर्वांच्या सहकार्याने रुग्णालयाचे रुपडे पालटत असून अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे हे रुग्णालय होणार आहे. याकामी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख आमदार आवाडे यांनी केला.
यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्रकुमार शेट्ये, बाळासाहेब कलागते, डॉ. श्रीकांत सुर्यवंशी, डॉ. महेश महाडिक, आर्किटेक्ट सिकंदर नदाफ, कॉन्ट्रॅक्टर संकेत गांधी उपस्थित होते.