वृत्तसार:
हाथरस घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त होत असताना आता उत्तर प्रदेशातील एका आमदाराने या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
सध्या उत्तरप्रदेशमधील हाथरस, बलरामपूरमध्ये अत्याचाराच्या घटनांनी संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच आता उत्तर प्रदेशातील एका आमदाराने या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुरेंद्र सिंह यांना पत्रकारांना हाथरस प्रकरणावर प्रश्न विचारला. पत्रकारांनी विचारलं की,’असं म्हटलं जातंय की हे रामराज्य चालू आहे. या रामराज्यात बलात्कारासारख्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. याचं काय कारण आहे.’चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं वक्तव्य भाजपचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.
या संदर्भात त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे की, मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त सरकार आणि तलवारीनं बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे, असं वादग्रस्त वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केलंय. जिथं सरकारचा धर्म सुरक्षा करण्याचा आहे तसा परिवाराचा धर्म आहे संस्कार देण्याचा. सरकार आणि संस्कार मिळून भारताला सुंदर बनवू शकतात, असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.