मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरु झाल्या आहेत. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. शनिवारी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्ष बीकॉमच्या विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबर, तर तृतीय वर्ष बीएच्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा संधी दिली जाणार आहे. आयडॉलची अंतिम वर्षांची परीक्षा शनिवारपासून सुरू झाली. संकेतस्थळाचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड परीक्षेच्या किमान २४ तास आधी विद्यार्थ्यांना पाठवणे आवश्यक असतानाही शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना ही माहिती पाठविली गेली नाही. ज्या विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळाला होता त्यांना तांत्रिक अडचणींमुळे शनिवारी परीक्षा देता आली नाही.
पहिल्या दिवशी बीए, बीकॉम, बीएसस्सी आयटी, बीएसस्सी कम्प्युटर अशा चार अभ्यासक्रमांच्या परीक्षा होत्या. या परीक्षांसाठी साधारण साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मदतकक्षाशी संपर्क साधला असता उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी कालिना संकुल गाठल्याने काही काळ विद्यापीठाच्या परिसरात गोंधळाचे वातावरण होते.