You are currently viewing जागतिक परिचारिका दिनानिमित्त ओरोस येथे परिचारिकांचा खास कौतुक सोहळा संपन्न

जागतिक परिचारिका दिनानिमित्त ओरोस येथे परिचारिकांचा खास कौतुक सोहळा संपन्न

*कोरोना काळात परिचारिकांनी दिलेल्या सेवेमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले -आ. वैभव नाईक*

ओरोस :

नर्सिंग ही खऱ्या अर्थाने ईश्वर व देशसेवा आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरांसमवेत रुग्णांना जी सेवा दिली. त्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकले, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या कामगिरीचे कौतुक केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या वतीने खास कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉ. जोशी व जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन श्रीमती वसावे सिस्टर उपस्थित होत्या. या प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.दरम्यान दुपारी आ. वैभव नाईक यांनी परिचारिकांसमवेतच जेवण करून त्यांचा आनंद द्विगणित केला.

यावेळी बोलताना आमदार नाईक यांनी पुढील वर्षापासून जिल्हास्तरावर एकत्र व मोठ्या स्वरुपात कार्यक्रम आयोजित करण्याची संकल्पना मांडून त्यासाठी आपली सर्वतोपरी मदत राहील, अशी ग्वाही दिली.

शेखर सामंत यांनी देखील या परिचारिकांनी कोरोना काळात समर्पित भावनेतून दिलेल्या सेवेचे कौतुक केले. या सेवेमुळे हजारो रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे आशीर्वाद त्यांना मिळाल्याचे ते म्हणाले. अशीच सेवा या पुढेही जनतेला मिळत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या कार्याबद्दल त्यांनी गौरोद्गार काढताना जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका तृप्ती पुजारे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अनेक अडचणी आल्या असता आ.वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर देत मदतकार्य केल्याची आठवण यावेळी शेखर सामंत यांनी करून दिली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत करोना काळात उत्तम कामगिरी बजावलेल्या परिचारिकांचा आ. वैभव नाईक, शेखर सामंत, डॉ. जोशी व मेट्रन वसावे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा