इचलकरंजी :
असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांचे विविध शासकीय सुविधांच्या लाभाचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या कामगारांना शासकीय सुविधांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.तरी बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन लालसेना बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज इचलकरंजी येथे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आले. सदरचे निवेदन शाॅप इन्स्पेक्टर सुकुमार कोळी यांनी स्विकारले.
राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे.या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आरोग्य, अपघात विमा, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विवाहासाठी अनुदान, पेन्शन, घरकुल अशा विविध सुविधा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे अनेक बांधकाम कामगारांना कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून मिळणा-या विविध सुविधांच्या लाभापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप लालसेना बांधकाम कामगार संघटनेने केला आहे.याच अनुषंगाने आज या संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आले.यामध्ये बांधकाम कामगारांचे विविध लाभाचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत दाखल केलेले अर्ज मंजूर करुन योजनेचा लाभ मिळावा. मागील शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा, थकीत कोविड अनुदान कामगारांच्या खात्यावर जमा करावेत, शासकीय कार्यालयात तक्रार बुक ठेवण्याची कार्यवाही करावी. योजनेच्या लाभाची यादी कार्यालयात लावावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सदरचे निवेदन शाॅप इन्स्पेक्टर सुकुमार कोळी, सौ.लोहार यांनी स्विकारले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते हणमंत लोहार यांनी सदर मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागू, असा इशारा दिला.
यावेळी लालसेना बांधकाम कामगार सेनेचे महेश लोहार , रविंद्र सुतार, सुरेश पवार, विष्णू मोरे, मंगल तावरे, मीना भोरे, महेश कांबळे, वर्षा जाधव, सर्जेराव खोत, रविंद्र माळगे यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.