विशेष संपादकीय….
श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नंतर राजघराण्यातील कोणी राजकारणात प्रवेश केला नव्हता. राणीसाहेबांनी विधानसभा लढविली होती, परंतु त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नव्हते, त्यानंतर मात्र राजघराणे राजकारणापासून दूरच राहिले होते. परंतु अलीकडेच श्रीमंत शिवरामराजे भोसलेंचे नातू युवराज लखमराजे भोसले यांनी मुंबईत जात राज्याचे विरोधीपक्ष नेते फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदींच्या उपस्थितित भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आणि राजघराण्यातील नवी पिढी राजकारणात आली. उच्चशिक्षित असलेले युवराज लखमराजे भोसले हे श्रीमंत शिवरामराजे भोसलेंचे नातू व राजघराण्याचे वारस याखेरीज त्यांची ओळख जनतेला नाहीच. किंबहुना सावंतवाडी शहर वगळता उर्वरित मतदारसंघ त्यांना नावानेही ओळखत नसेल. श्रीमंत शिवरामराजे भोसले हे राज्याभिषेक झालेले सावंतवाडी संस्थानचे शेवटचे राजे, परंतु तब्बल २५ वर्षे त्यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले हे कमी नव्हते. राजे गावागावात प्रचारासाठी फिरायचे तेव्हा त्यांची नाळ मतदारसंघातील जनतेशी जुळत होती, राजे आपल्या घरी, गावी आले हा गर्वाचा क्षण असायचा. शिवरामराजेंची जनतेमध्ये मिसळण्याची, राजांबद्दल असलेले जनतेचे प्रेम ही वेगळी गोष्ट होती. परंतु लोकशाहीमध्ये आता खूप बदल झालेत, राज घराण्याची जनतेशी जवळीक होती ती खूपच कमी झाली. त्यामुळे राजघराण्याचे युवराज म्हणून मतं मिळणार नाहीत, जनता किती स्वीकारणार हे देखील पहावे लागेल. त्यासाठी युवराज लखमराजेंना राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर जनतेशी दृढ नाते निर्माण करणे, जनतेमध्ये मिसळणे आवश्यक आहे, त्यासाठी राजघराण्याची कवचकुंडले बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
राजघराण्यातील व्यक्ती आपल्या घरी, ऑफिस मध्ये येते हा आनंदच असतो. सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती वकील परिमल नाईक यांच्या कार्यालयास युवराज लखमराजेंनी भेट देत राजकारणात उतरल्यानंतरच्या आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे, त्यात माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, गोविंद प्रभू आदींनी भेटवस्तू देत युवराजांचे स्वागत केले आहे. परंतु युवराजांच्या राजकीय प्रवेशानंतर सावंतवाडीत युवराजांचे पक्षाच्यावतीने मोठे स्वागत होताना दिसून आले नाही याउलट सावंतवाडी भाजपामध्ये दोन गट होते अशी कुजबुज सुरू होती ती गटबाजी मात्र उघडपणे सावंतवाडीवासीयांना दिसून आली. त्यामुळे युवराज लखमराजेंचा राजकीय प्रवास सावंतवाडी मतदारसंघात तरी सहज सोपा नसणार याची झलक दिसून आली. आपली राजकीय कारकीर्द यशस्वी करायची असेल तर युवराजांना जनतेशी नातं घट्ट बनवावे लागणार, जनतेत उतरून तळागाळातील लोकांशी संपर्क वाढवावा लागणार आहे. शहरात काही ठिकाणी राजघराण्याची मालकी असलेल्या जमिनींमुळे कित्येक वर्षे विकासापासून दूर राहिलेले रस्त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. राजघराण्यापासून दुरावलेला समाज पुन्हा जवळ आणावा लागेल. शहरातील हॉस्पिटल, तलाव सुशोभीकरण आदी विषयांवर विचार करून निर्णय घ्यावा लागेल. परिणामी जनतेच्या विकासात्मक बाबींवर सखोल अभ्यास करावा लागेल.
सावंतवाडी तालुक्यात यापूर्वी कधी केसरकर तर कधी नारायण राणे यांचे प्राबल्य दिसून येत होते, परंतु मतदारसंघ आणि सावंतवाडी शहर मात्र केसरकरांनी आपल्याकडेच राखले होते. परंतु गेली दोन वर्षे भाजपाने सावंतवाडी शहरावर आपली सत्ता स्थापन केली आणि भविष्याची दिवास्वप्ने बऱ्याच जणांना पडू लागली. सावंतवाडी हे सुसंस्कृत सुशिक्षित लोकांचे शहर, त्यामुळे पुन्हा पारडे कुणाकडे झुकणार हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे सावंतवाडीच्या युवराजांना पक्षात प्रवेश करून घेत भाजपाने एक बाजी मारली आहे, त्यात किती यश येते हे काळच ठरविणार, परंतु तूर्तास भाजपामध्ये झालेली गटबाजी आणि रखडलेला शहर विकास, सावंतवाडीत निर्माण झालेला पाण्याचा भीषण प्रश्न, यामुळेच सत्ताधाऱ्यांवर शहरवासीय काहीसे नाराजच आहेत. दिलेली आश्वासने आणि पूर्तता याची सांगड घातली असता आश्वासने हवेतच विरल्याचे सत्य समोर येत आहे. त्यामुळे युवराजांची राजकारणात एन्ट्री झाली तरी एकंदरीत लोकप्रतिनिधींची तुटलेली एकी आणि विकास या मुद्द्यावर युवराजांना राजकारण म्हणजे तारेवरची कसरत ठरणार हे मात्र नक्कीच….!