जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची अप्रतिम काव्यरचना
न परतीच्या वाटेवरती माय निघोनिया गेली
पोरकेपणाची छाया काळजाला व्यापून उरली ||
आयुष्यातील वादळ वारे सुख-दुःखाचे हिंदोळे
जीवावरी माऊलीच्या सुखेनैव वाट चाले
तिच्या आधाराने माझी वाट सोपी झाली
न परतीच्या वाटेवरती माय निघोनिया गेली ||
भावविश्वाचा हा डोह,किती खोल बुडी घ्यावी
आठवणींची रंगीबेरंगी रत्ने हातामध्ये यावी
गुंतता तयात मी त्याची माळ गुंफुनिया गेली
न परतीच्या वाटेवरती माय निघोनिया गेली ||
दूर जरी होतो आम्ही जीवा तिची ओढ वाटे
आठवाने तिच्या आता उरामध्ये कढ दाटे
सत्य जरी जीवनाचे काळीज परी नाकारी
न परतीच्या वाटेवरती माय निघोनिया गेली ||
तिचा दूरचा प्रवास जीव होई कासावीस
अशक्य हे परी मना तिच्या भेटीचीच आस
मागणे एकच देवा पुन्हा तिची लेक करी
न परतीच्या वाटेवरती माय निघोनिया गेली ||
ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.