नगरपालिकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी आम्ही जमा केलेली रक्कम पालिकेत जमा ; हिशोब मागायचाच असेल तर नगराध्यक्ष अथवा पालिका प्रशासनाकडे मागा
मालवण :
मालवणात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यातील शाब्दिक द्वंद्व अद्यापही सुरूच आहे. सुदेश आचरेकर यांनी पालिकेच्या शतक महोत्सवावेळी व्यापाऱ्यांकडून जमा केलेल्या रक्कमेचा हिशोब दयावा, असे आवाहन करणाऱ्या मंदार केणींवर आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. आम्ही जमा केलेली रक्कम संबंधित व्यापाऱ्यांच्या हस्ते त्याचवेळी नगरपालिकेत नगराध्यक्षांकडे जमा केली आहे. त्यामुळे मंदार केणींना हिशोब मागायचाच असेल तर तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर किंवा पालिका प्रशासनाकडे मागावा, एवढं साधं लॉजिकही त्यांना नाही, असे उत्तर सुदेश आचरेकर यांनी दिले आहे. मंदार केणींनी स्वतः बिल्डरांकडून पैसे जमा करतो, याची कबुली देताना हे पैसे आपण शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च करत असल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या केणींनी कधी उष्ट्या हाताने कावळा हाकला नाही, ते लोकांना मदत काय करणार ? तौक्ते वादळात शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवणसाठी दोन कंटेनर भरून पत्रे, कौले आणि ताडपत्री पाठवल्या होत्या. यातील एक कंटेनर मधील साहित्य मंदार केणींनी हडप करीत स्वतःच्या हॉटेलला वापरल्याचा आरोप यावेळी सुदेश आचरेकर यांनी केला आहे.
येथील भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, भाऊ सामंत, महेश सारंग, विलास मुणगेकर, मोहन वराडकर, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते.